नागपूर: स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त शहर साकारण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मनपातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याअंतर्गत मूर्ती विसर्जनासाठी गांधीसागर तलाव येथे स्थायी कृत्रिम कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण आज (ता. ३१ऑगस्ट) गांधीसागर तलाव येथे महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते व आमदार विकास कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सत्तापक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक व माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, धंतोली झोनचे सभापती प्रमोद चिखले, माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत,नगरसेविका उज्ज्वला शर्मा, विजय चुटेले, लता काटगाये, हर्षला साबळे, धंतोली झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, नद्या व सरोवरे विभाग उपअभियंता मो. इजराईल उपस्थित होते.
दरवर्षी मूर्तीविसर्जनासाठी सर्वाधिक भाविक गांधीसागर तलाव येथे येत असल्याने येथे स्थायी स्वरुपात टॅंकची निर्मिती कऱण्यात आली आहे. पुजेचे साहित्य आणि निर्माल्य गोळा कऱण्यासाठी देखिल याठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहे. यासोबतच कृत्रिम तलाव देखिल गांधीसागर तलावाच्या शेजारी उभारण्यात आले आहे. भाविकांनी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर साकारण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले.