मुंबई : दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज महाराष्ट्रात 3.05 लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्यासंदर्भात करार केला आहे. महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) यांनी दावोस, स्वित्झर्लंड येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समिटच्या निमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये 3 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी 3.05 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या कराराची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्रात न्यू एनर्जी आणि रिटेलसह इतर क्षेत्रात 3.05 लाख कोटी रुपयांची ही गुंतवणूक केली जाणार आहे. राज्याच्या विकासाला चालना देणारी ही ऐतिहासिक गुंतवणूक असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सीएमओच्या वतीने सांगण्यात आले की, महाराष्ट्रासाठी हा खूप महत्त्वाचा क्षण आहे. अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली GoM आणि RIL यांनी दावोसमध्ये या मोठ्या करारावर स्वाक्षरी केली आहे.
3 लाखांहून अधिक जणांना रोजगाराची संधी –
या गुंतवणुकीच्या माध्यमातून न्यू एनर्जी, रिटेल, हॉस्पिटॅलिटीसह उत्पादन क्षेत्रात 3,00,000 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या कराराबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रिलायन्सची ही गुंतवणूक पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, बायो-एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल, औद्योगिक क्षेत्रातील वाढ, डेटा सेंटर, टेलिकॉम आणि रिअल इस्टेट यासह इतर अनेक क्षेत्रात केली जाईल.