नागपूर: नागपूर शहरात शुक्रवारी २२ सप्टेंबरला मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पुरसदृश्य परिस्थितीमुळे बाधित पुरग्रस्त भागाची महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील यांनी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सकाळी पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.
मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील यांनी अंबाझरी तलावाचा क्षतिग्रस्त भाग, कॉर्पोरेशन कॉलनी, काछीपुरा झोपडपट्टी, शंकरनगर चौक, अंबाझरी घाट आणि पंचशील टॉकीज जवळील नाग नदीचे नुकसानग्रस्त पूल या सर्व भागांना भेट दिली आणि पाहणी केली. कॉर्पोरेशन कॉलनी, काछीपुरा झोपडपट्टी, शंकरनगर चौक, अंबाझरी लेआऊट या भागांची पाहणी करताना त्यांनी येथील पुरामुळे बाधित नागरिकांशी संवाद साधला. नागपूर महानगरपालिकेद्वारे देण्यात येत असलेली अन्नधान्य किट आणि नुकसानीचे पंचनामे आदींची देखील माहिती त्यांनी जाणून घेतली.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता श्री मनोज तालेवार, उपजिल्हाधिकारी श्री हरीश भामरे, सहायक आयुक्त श्री प्रकाश वराडे, श्री मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता श्री विजय गुरुबक्षाणी, तहसीलदार श्री राहुल खंडारे उपस्थित होते.