Published On : Tue, Feb 18th, 2025
By Nagpur Today Nagpur News

उष्माघातापासून नागरिकांना मिळणार दिलासा

बाजारपेठ, वर्दळीच्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

नागपूर : वाढता उष्मा आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी उन्हाळ्यात उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळावा याकरिता विविध उपायायोजना केल्या जातात. या नियोजनासंदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी मंगळवारी (ता. १८) उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेतली.

अतिरिक्त आयुक्तांच्या सभाकक्षात आयोजित बैठकीत उपायुक्त श्री. विजय देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) श्रीमती अल्पना पाटने, सहायक शिक्षणाधिकारी श्री. संजय दिघोरे, नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते.

Gold Rate
Tuesday 18 Feb. 2025
Gold 24 KT 85,800 /-
Gold 22 KT 79,800 /-
Silver / Kg 96,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेतर्फे उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची शहरात दरवर्षी अंमलबजावणी केली जाते. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांना सादरीकरणाद्वारे नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी बस डेपो, पेट्रोल पंप, बाजारपेठ, वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी याकरिता टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा तसेच मार्केट असोसिएशनशी चर्चा करून बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणी जागा निश्चित करावी असेही निर्देश त्यांनी दिले.

शहरातील सर्व उद्याने दुपारी १२ ते ४ वाजतापर्यंत सुरु ठेवावेत, टँकरच्या माध्यमातून रस्त्यावर पाण्याची फवारणी करावी, महत्वाच्या चौकात ग्रीन नेट लावण्यात यावी, विविध बांधकाम ठिकाणी कामगारांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी याकरिता कंत्राटदारांना संपर्क साधावा, रस्त्यावरील प्राण्यांकरिता आणि पक्षांकरिता महानगरपालिकेच्या विविध इमारती, शाळा या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, उद्यानांमध्येही पक्ष्यांकरिता पाणी उपलब्ध होईल अशी सुविधा तयार करावी तसेच रस्त्यावरील प्राण्यांकरिता शेल्टर होम तयार करण्यात यावे, त्यात योग्य वेटिंलेशनची दक्षता घ्यावी, आवश्यकता पडल्यास सामाजिक संघटनांची मदत घ्यावी असेही निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी यावेळी दिले. मनपाच्या विविध इमारतींमध्ये मिस्टिंग कूलिंग लावण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी सूचना केली.

यावेळी समाज विकास विभागाचे प्रमोद खोब्रागडे, उद्यान विभागाचे संजय गुजर, जलप्रदाय विभागाचे प्रकाश यमदे, नरेंद्र भांडारकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे (अग्निशमन) सतीश रहाटे, स्लम विभागाचे एस. एस. चोमाटे उपस्थित होते.

Advertisement