नागपूर : लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या उपराजधानीकडे लागले आहे. भाजपाच्या हेवीवेट नेत्याला तोड देण्यासाठी काँग्रेस पक्षानेही त्याच तोडीची प्रचार यंत्रणा उभारली आहे. काँग्रेसचा उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी १०० मतदारांमागे एका काँग्रेस कार्यकर्त्याची नियुक्ती केली असून, प्रचार यंत्रणा प्रभावी ठरण्यासाठी विविध कमिट्या गठित केल्या आहेत. या सर्वांचे रिमोट कंट्रोल देवडिया भवनात आहे.
निवडणूक प्रचार यंत्रणेचे नियोजन करण्यात आले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यावर शहर अध्यक्ष यांचे नियंत्रण आहे. त्यात ११ सदस्य असून, या अकराही सदस्यांना विविध कमिट्यांचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. यात प्रोटोकॉल टीम, मीडिया को-ऑर्डिनेशन, कंट्रोल रुम, प्रचार प्रमुख, नियोजन प्रमुख, कायदेशीर सल्ला या कमिटीवर ६ ते ७ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रोटोकॉल टीम उमेदवाराच्या प्रचारासाठी येणाऱ्या व्हीआयपी, स्टार प्रचारकांच्या सभांचे, निवासाचे, लागणाऱ्या साहित्याचे नियोजन करणार आहे.
मीडिया को-ऑर्डिनेशन टीमकडे प्रसिद्धी माध्यमांचे काम आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. कंट्रोल रुम हा संपूर्ण प्रचाराचा कणा आहे. उमेदवाराचे सकाळपासूनच्या पदयात्रेचे, सभांचे नियोजन तसेच विधानसभानिहाय तयार करण्यात आलेल्या कार्यालयातून होणाऱ्या प्रचाराचे नियोजन आणि मार्गदर्शन कंट्रोल रुमद्वारे होत आहे. प्रचार प्रमुख ही विंग काँग्रेस विचारधारेच्या लोकांना एकत्र करण्याचे काम करीत आहे. त्यांना मंच उपलब्ध करून देण्यात येत आहे. लीगल सपोर्ट टीमकडे आचारसंहितेशी संदर्भातील आणि निवडणूक आयोग यांच्या सूचनांचे पालन करण्याचे काम आहे.
देवडिया काँग्रेस भवनातूनच सभा, पदयात्रेच्या परवानग्या, प्रचाराचे साहित्य उपलब्ध करून दिल्या जात आहे. काँग्रेसने आपल्या निवडणूक कार्यालयात काहीच लोकांना बसविले आहे. जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरभर प्रचारात व्यस्त आहेत.
रात्री घेतला जातो आढावा
प्रत्येक टीमला दररोज कामाची जबाबदारी दिली आहे. सीडब्ल्यूसीच्या सदस्यांचे त्यावर नियंत्रण आहे. आदल्या दिवशी उमेदवाराच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे. दिवसभरात जी काही कामे झाली, काय उणिवा राहिल्या, याचा संपूर्ण आढावा सर्व समिती प्रमुख रात्रीला घेतात. शहर अध्यक्षांच्या मार्गदर्शनात प्रचाराचे संपूर्ण नियोजन सुरू आहे.
यांच्यावर आहे जबाबदारी
संदेश सिंगलकर, गजराज हटेवार, निखिल धांडे, दिनेश बानाबाकोडे, उमेश शाहू, अॅड. अभिजित वंजारी, अॅड. रेखा बाराहाते.