इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधीतून मनपाला सहकार्य
नागपूर : नागपूर शहरातील फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव तलावांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेला मोठे सहकार्य मिळाले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे सीएसआर निधीतून मनपाला ‘रिमोट ऑपरेटेड बोट’ प्राप्त झालेली आहे. बॅटरीआधारीत या बोटद्वारे शहरातील प्रमुख तलावांमधील तरंगता कचरा स्वच्छ करण्याचे महत्वाचे कार्य होणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात शहर स्वच्छतेच्या कार्यात आता तलाव स्वच्छतेचे कार्यही जलद गतीने व सुरळीतरित्या होणार आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे नागपूर महानगरपालिकेला २९ लक्ष रुपये सीएसआर निधीमधून ‘रिमोट ऑपरेटेड बोट’ देण्यात आली आहे. ही बोट बॅटरीवर आधारित असून एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर सुमारे ४ ते ५ तास कार्य करते. एका तलावात एकावेळी ४ ते ५ किमी पर्यंत सतत स्वच्छतेचे कार्य करण्याची क्षमता या बोटची आहे. बोटच्या संचालनासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून तांत्रिक व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातील फुटाळा, अंबाझरी आणि सोनेगाव तीन प्रमुख तलावांची स्वच्छता बोटद्वारे करण्यात येत आहे. प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस एका तलावाचे स्वच्छता कार्य सुरू आहे. सोमवार व मंगळवारी फुटाळा तलाव, बुधवार व गुरूवारी अंबाझरी तलाव आणि शुक्रवार व शनिवारी सोनेगाव तलावाची स्वच्छता ‘रिमोट ऑपरेटेड बोट’द्वारे केली जात आहे. तलावात टाकला जाणारा कचरा पाण्यावर तरंगत असतो. त्यामुळे तलावातील पाणी दुषित होते शिवाय तलावाचेही प्रदूषण वाढते. ‘रिमोट ऑपरेटेड बोट’मुळे तलावात असलेला कचरा काढला जाउन तलाव स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे.