नागपूर: महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी शहरातील खामला व महाल बाजार भागातील फूटपाथवरील दुकानदारांचे अतिक्रमण हटवले. पथकाने खामला मटन मार्केट चौक ते भाजीबाजार मार्गावरील दुकानदाराचे अतिक्रमण हटवले.
या परिसरातील नागरिकांना गरजेनुसार भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी मागील गेल्या काही वर्षापासून दुकाने लागतात. आता लंडन स्ट्रीटच्या नावाखाली येथील दुकानदारांना हटविले जात आहे. परंतु अतिक्रमण हटविण्यापूर्वी येथील दुकानदारांची प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी जेठानी यांनी केली.
दुसऱ्या पथकाने महाल बाजार परिसरातील फूटपाथवरील कापड विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले. यामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली होती. तिसरे पथक सीताबर्डी मेनरोडवर ठाण मांडून होते. या पथकाने रोडवर हॉकर्सची दुकाने लागू दिली नाही. सणासुदीच्या दिवसात व्यवसाय करता येत नसल्याने विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली.