नागपूर : रामदासपेठ येथील रहिवासी असलेले प्रसिद्ध डॉक्टर सुनील मोतीरामजी लांजेवार यांना ४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा धमकीचा फोन आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेमुळे पोलिसांनी डॉ. लांजेवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी तातडीने पाऊले उचलली.
सीताबर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनता चौकातील श्रीमन कॉम्प्लेक्समध्ये दादासाहेब लांजेवार हॉस्पिटल चालवणारे डॉ. लांजेवार (६५) यांना एका खंडणीखोराने 40 लाख रुपये देण्याची मागणी केली आहे. लांजेवार यांना . 15 मे रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास 9890087241 या मोबाईल क्रमांकावरून धमकीचा कॉल आला होता. कॉलरने हिंदीत बोलताना डॉ. लांजेवार यांना रक्कम दिली नाही तर जीवे मारु, अशी धमकी दिली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टर लांजेवार यांनी तातडीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना यासंदर्भात माहिती दिली. डॉक्टर लांजेवार यांनी मदतीची मागणी करताच कुमार यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. डॉ. लांजेवार यांचे निवासस्थान आणि त्यांच्या रुग्णालयाच्या परिसरात सुरक्षा पुरवण्यासाठी 24 तास सशस्त्र पोलीस दल तैनात करण्याचे निर्देश त्यांनी विशेष शाखेला दिले. डॉ लांजेवार, त्यांची पत्नी डॉ छाया आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे , असे सीताबल्डी पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.