नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासद्वारे नागपूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या उद्यानांच्या प्रत्यक्ष स्थिती संदर्भातील अहवाल गुरूवारी (ता.१३) महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. उद्यानांच्या स्थितीसंदर्भात मनपाद्वारे स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली होती. समितीच्या अभिप्रायाचा अंतिम अहवाल स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी महापौरांकडे सादर केला. यावेळी स्थापत्य समिती उपसभापती निशांत गांधी, सदस्या वंदना चांदेकर उपस्थित होते.
मनपाद्वारे गठीत समितीमध्ये स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, उपसभापती निशांत गांधी, सदस्या वैशाली रोहणकर, रूपा राय, सदस्य दिपक वाडिभस्मे, वंदना भुरे, आशा उईके, मनोजकुमार गावंडे, वंदना चांदेकर यांचा समावेश आहे.
नागपूर सुधार प्रन्यासकडून नागपूर महानगरपालिकेला ४४ उद्याने हस्तांतरीत करण्यात आली आहेत. या उद्यानांच्या प्रत्यक्ष स्थितीबाबत समितीद्वारे एकूण पाच वेळा पाहणी करण्यात आली. यामध्ये ४४ पैकी ३ उद्यानांची स्थिती चांगली असून २० उद्याने सर्वसाधारण स्थितीत तर २१ उद्याने अत्यंत वाईट स्थितीत आहेत. ४४ उद्यानांपैकी ३ उद्यानांमध्ये किरकोळ स्थापत्य कामांची गरज असून २० उद्यांनांमध्ये पायवाट दुरुस्ती, कम्पाउंड दुरूस्ती, रंगरंगोटीची कामे आणि २१ उद्यानांमध्ये सुरक्षा भिंतीचे बांधकाम, पायवाटेचे नूतनीकरण ड्रेन लाईन टाकणे, पाण्याची नवीन पाईप लाईन टाकणे याशिवाय अस्तित्वात असलेल्या गार्डरुम, प्रसाधगृह व इतर स्ट्रक्चरलचे नूतनीकरण करण्यास सर्व उद्यानातील खेळणी, ग्रीन जिम दुरुस्त करून नवीन साहित्य उपलब्ध करण्याची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नासुप्रच्या मोठ्या उद्यानातील स्कल्पचर व म्यूरलचे नविनीकरण करणे, कारंज्याची दुरस्ती, नूतनीकरण, योगाशेडची दुरूस्ती, रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचेही समितीद्वारे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सर्व उद्यानांमध्ये देखभालीचा अभाव असून या उद्यानांच्या नव्याने देखभालीच्या निविदा बोलाविणे आवश्यक असून नूतनीकरणावर येणा-या खर्चास सुधारित अर्थसंकल्पात ते ठेवण्यात यावे, असा अभिप्राय स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी अहवालात दिला आहे.
नासुप्रकडून हस्तांतरीत करावयाच्या उद्यानांची देखभाल ५ जुलै २०२० पासून नागपूर सुधार प्रन्यासद्वारे बंद करण्यात आली. ६ जुलै २०२० पासून ते ५ एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये नासुप्रच्या कंत्राटदार उद्यानांची देखभाल करीत होते. त्यांना कोणतेही भूगतान न केल्यामुळे उद्यानांच्या देखभालीचे काम बंद करण्यात आले. उद्यानांच्या देखभालीसंदर्भात नागरिकांच्या येणा-या तक्रारी लक्षात घेता मनपाच्या सभागृहाने ८ सप्टेंबर २०२१ ला ही उद्याने हस्तांतरीत करून घेण्यास मंजुरी दिली. ६ जुलै २०२० ते आतापर्यंत उद्यानांमध्ये झालेल्या देखभालीचा खर्च, नूतनीकरणावरील खर्च आणि सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर झालेला खर्च नागपूर महानगरपालिकेने नागपूर सुधार प्रन्यासकडून घेण्याची शिफारश समितीद्वारे करण्यात आली आहे.