नागपूर: समाजात अनेक क्षेत्रात संशोधनाच्या हस्तक्षेपाव्दारे समस्यांवर समाधान शोधले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट इंडीया हॅकेथॉन’ या स्पर्धेमार्फत विविध नागरी समस्यांवर ऑनलाईन उपाय विदयार्थ्यामार्फंत शोधण्याचा उपक्रम गत 2 वर्षांपाससून चालू आहे. ज्याप्रमाणे औद्योगीक संस्था ‘कार्पोरेट समाजिक जबाबदारी’ अंतर्गत समाजहिताचे कार्य करतात त्याच आधारे प्रादेशिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था यांनी ‘संस्थात्मक सामाजिक जबाबदारी’ अंतर्गत नाविन्यपूर्ण कल्पना व शोध यांच्याव्दारे समाजपयोगी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन नागपूरचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी आज केले. ‘26 एप्रिल’ :जागतिक बौध्दिक संपदा अधिकार दिनाप्रसंगी केंद्रीय वाणिज्य व उदयोग मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्या अधीन असणा-या नागपूर येथील राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था (आर.जी.एन.आय.आय.पी.एम.) व कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सी.आय.आय.) यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित ‘बौद्धिक संपदा अधिकार व तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण कल्पनाचे प्रदर्शन’ या विषयावर आधारित परिसंवादाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते संस्थेच्या सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आर.जी.एन.आय.आय.पी.एम. संस्थेचे प्रमुख आणि पेटंट व डिझाईन्स विभागाचे उपनियंत्रक पंकज बोरकर, सी.आय.आय. च्या विदर्भ क्षेत्रीय परिषदेचे अध्यक्ष राहुल दिक्षीत, उपाध्यक्ष विजय रावल, आर.जी.एन.आय.आय.पी.एम. च्या वरिष्ठ डाक्युमेंटेशन अधिकारी छाया सातपुते, गोडबोले गेटस् प्रा.लि. चे संचालक प्रशांत गोडबोले प्रामुख्याने उपस्थित होते.
बी.टी. कॉटन या जनुकीय तंत्रज्ञानासाठी मॉन्सेटो सारख्या बलाढय कंपनीला संशोधन व विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे.कृषी क्षेत्रात मॉन्सेटो कंपनीने बी.टी.कॉटन या प्रगत व जास्त खर्चिक तंत्रज्ञानाव्दारे बोंड अळीच्या प्रादुर्भावाला शेतक-यांना सामोर नेले. यावर उपाय म्हणून संशोधन संस्थानी येथील स्थानिक वातावरणाशी सुसंगत असणा-या ,कमी भांडवल खर्च असणा-या तंत्रज्ञान पद्धती शेतक-यांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत. भारतातील बायो-डिझेल (जैव इंधन) निर्मितीक्षेत्र हे जट्रोफा, करंज यांच्या लागवडीच्या अभावी संथ पडले आहे. यासाठी संशोधनाव्दारे शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये खुंटत असलेला संवाद पुन्हा सुरू करणे काळाची गरज आहे.
आर.जी.एन.आय.आय.पी.एम. ही शहरातील एक बौद्धिक संपदेची संस्था असून यासारख्या अनेक शैक्षणिक तसेच संशोधन संस्था नागपूरात एक बौद्धिक संसाधनांच्या स्वरुपात उपलब्ध आहेत.त्यांचा वापर करणे ही आपल्या दृष्टीने हितकारक आहे. भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आय.आय.एम) विदयार्थ्यांनी विदर्भातील मत्स्य व्यवसाय, गैर सागवाणी वन उपज तसेच लॉजीस्टिक हब या संदर्भातील सादरीकरण करून स्थानिक साधन संपत्तीचा वापर करण्याचा मार्ग सुचविला आहे, अशी माहिती अनुप कुमार यांनी यावेळी दिली.
ज्याप्रमाणे नागपूर संत्र्याला भौगोलिक संकेताक मिळाला त्याचप्रमाणे नागपूर येथील सावजी मसाला, वर्ध्याची वायगाव हळद यांना भौगोलिक संकेताक मिळण्यासाठी संबधित क्षेत्रातील समुदायाचे संशोधन संस्थासोबत विचारमंथन होणे गरजेचे आहे,असे मत कुमार यांनी विदर्भातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या महत्व व उपयोगाबाबत माहिती देतांना मांडले.
चाकोरीबाहेरील कल्पना अविष्कारातूनच स्टीव्ह जॉब्स, बिल गेटस् यांनी फोर्ब्सच्या यादीत नाव कमाविले आहे .ज्ञानाआधारित अर्थव्यवस्थेमध्ये कल्पना व नवीन उपक्रम यांना अन्यनसाधारण महत्व आहे. यासाठी शैक्षणिक संस्थामध्ये व्यावसायिक संस्थानी संशोधन व विकासासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. पाश्चात्य देशात संशोधन, पेटंट याबाबत पोषक वातावरण असून भारताचे बौद्धिक संपदा अधिकार क्षेत्रातील वैश्विक योगदान हे तुलनेने कमी असल्याचे अनुप कुमार यांनी याप्रसंगी नमुद केले.
सी.आय.आय. विदर्भ क्षेत्रीय परिषदेचे अध्यक्ष अध्यक्ष राहुल दिक्षित यांनी बौद्धिक संपदा अधिकारामुळे (आय.पी.आर.) कोणत्याही क्षेत्रातील ज्ञानाचे संरक्षण करण्याची हमी मिळते, ही बाब स्पष्ट करतांना उदयोग क्षेत्रानेही आय.पी.आर. क्षेत्रात गुंतवणूक वाढवली असल्याचे यावेळी सांगितले. केंद्रीय मध्यम, लघु व सुक्ष्म मंत्रालयाव्दारे सी.आय.आय च्या सहकार्याने आय.पी.एफ.सी.(इंटेलेक्च्युयल प्रापर्टी फॅसिलिटेशन सेंटर) या संस्थेची स्थापना करण्यात आली असून या केंद्राव्दारे आय.पी. क्षेत्रात उद्योगाव्दारे भांडवल उभारणी केली जात असल्याचे दिक्षीत यांनी सांगितले.
जागतिक बौद्धिक संपदा संस्था (विपो) ही 1970 मध्ये 26 एप्रिल या दिवशी स्वित्झर्लॅडमधील जिनिव्हा येथे स्थापन झाली. हा दिवस ‘ जागतिक बौद्धिक संपदा अधिकार दिन’ म्हणून विपोतर्फे साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पनाही ‘परिवर्ताला बळ: नाविन्सपूर्ण उपक्रम व सर्जनशीलतेमध्ये महिलांचे योगदान’ हा आहे. अशी माहिती संस्थेच्या वरिष्ठ डाक्युमेंटेशन अधिकारी छाया सातपुते यांनी दिली. उद्घाटकीय सत्राचे सूत्र संचालक संस्थेचे अश्विन तुरणकर यांनी तर आभार प्रदर्शन सी.आय.आय. विदर्भ क्षेत्रीय परिषदेचे उपाध्यक्ष रावल यांनी केले.
उद्घाटकीय सत्रानंतर प्रथम तांत्रिक सत्रात ‘बौद्धिक संपदा अधिकारी ओळख व व्यावसायीकरण’ यावरछाया सातपुते यांनी सादरीकरणाव्दारे पेटंट, जी.आय. ट्रेडमार्क तसेच कॉपीराईटचे महत्व विषद केले. संस्थेचे प्रमुख पंकज बोरकर यांनी व्दितीय तांत्रिक सत्रात ‘पेटंटींग प्रक्रीयेवर’ माहितीपूर्ण विवेचन केले. या परिसंवादादरम्यान संशोधक विदयार्थ्यांनी पेटंट केस स्टडीज व आय.पी.आर. संदर्भात प्रबंध सादरीकरणही केले. या परिसंवादाला संशोधक, उदयोजक, विदयार्थी तसेच सी.आय.आय.चे पदाधिकारी व आर.जी.एन.आय.आय.पी.एम. संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.