नागपूर: वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणकडून नागपूर शहरात उपविभागीय पातळीवर वीज ग्राहकांचे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. नंदनवन उपविभागात आयोजित तक्रार निवारण मेळाव्यात ३२५ वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याची माहिती महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी दिली.
सप्टेंबर-२०१९ मध्ये महावितरणने या भागातील वीज वितरणाची जावबदारी स्वीकारल्यावर वीज ग्राहकांच्या किरकोळ स्वरूपाच्या अनेक तक्रारी प्रलंबित होत्या. या तक्रारींचे निराकारण करण्यासाठी महावितरणच्या नंदनवन उपविभागाच्या वतीने २२ ते २४ जानेवारी या काळात तक्रार निवारण आणि संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात वीज देयकाची दुरुस्ती, नावात बदल करणे, लघु दाब वाहिनीच्या समस्या, नवीन वीज जोडणीत असलेला अडथळा दूर करणे आदी समस्या घेऊन वीज ग्राहक या ठिकाणी आले होते.
महावितरणच्या नंदनवन उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन जयस्वाल यांनी मेळाव्यात आलेल्या सर्व वीज ग्राहकांच्या समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यात नवीन वीज जोडणीच्या १२१, नावात बदल करण्याच्या १३०, कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या ५५, वीज देयकाच्या दुरुस्तीच्या १९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले.
वाठोडा शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता प्रितेश वंजारी, उमरेड रोड शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता श्रीकांत बहादुरे, जुना बगडगंज शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता अभिजित घोडे, सूतगिरणी शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता अमित शिंदे यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकुन घेत त्याचे निराकरण केले.