नागपूर : जागतिक विचार दिन अर्थात वर्ल्ड थिंकींग डे च्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये कचरा विरहित (झिरो वेस्ट) कार्यालयाचा संकल्प करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मनपा मुख्यालयासह सर्व झोन कार्यालयांमध्ये ‘झिरो वेस्ट’ कार्यालयाच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात आला.
मनपाच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या दहाही झोन कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचा-यांनी त्यांच्या झोन इमारतीच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ सुद्धा घेतली आणि लक्ष्मीनगर झोनमध्ये कर्मचा-यांना कागदी पिशव्या वितरीत करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यालयामध्ये प्लास्टिकचा वापर टाळणे, पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटल ऐवजी स्टिलची बॉटल, ग्लासचा वापर करणे, कार्यक्रमांमध्ये कचरा होणार नाही याची काळजी घेणे, चहासाठी पुनर्वापर करता येणारे कप वापरणे, स्वागतासाठी पुष्पगुच्छा ऐवजी रोपटे देउन स्वागत करून कचरा विरहित कार्यालय करण्याचा संकल्प या निमित्ताने मनपामध्ये घेण्यात आला.