प्रजासत्ताकदिनी महापौर दयाशंकर तिवारी यांचे प्रतिपादन
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याला ७५वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोठे योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत स्फुल्लींग चेतविण्यासाठी त्यांनी ‘तुम मुझे खुन दो, मैं तुम्हें आजादी दुंगा’ असा नारा दिला होता. आज आपण स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. आज आधीसारखी स्थिती नसली तरी आज आपण आपले वर्तन सुधारूनही आपल्या देशाप्रती आपले प्रेम, आपली भावना व्यक्त करू शकतो. आज देशप्रेम व्यक्त करण्यासाठी ‘खुन’ देण्याची गरज नाही. मात्र घरातील कचरा ओला आणि सुका विलग करणे, नियमित वेळेवर कर भरणे, वाहतूक नियमांचे पालन करणे, कोरोना नियमावलीचे पालन करणे या सर्व बाबींचे आपल्या वर्तनातून होणारे पालन हे आपल्या राष्ट्राप्रती आपली जबाबदारी आणि आपले प्रेम प्रतित करणारी बाब आहे, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
२६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मनपा मुख्यालयातील हिरवळीवरी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते. कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार गर्दी टाळण्यासाठी कार्यक्रमात फक्त मनपाच्या विभाग प्रमुखांनाच आमंत्रित करण्यात आले होते.
प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. याशिवाय कुष्ठरोग निर्मूलनाची शपथही उपस्थितांनी घेतली.
महापौर म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शहरात ७५ वंदे मातरम् हेल्थ पोस्ट, वंदे मातरम् उद्यान, डॉ.विजय भटकर वैज्ञानिक अनुषंधान केंद्र साकारण्यात येत आहेत. नागपूर शहरातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करण्यास मनपा कटिबद्ध आहे. शहरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी ६ इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. देशभरात गाजलेल्या अपूर्व विज्ञान मेळाव्यातून पुढे आलेल्या दोन विद्यार्थीनींनी अंतरिक्षात उपग्रह सोडण्याच्या विक्रमात सहभागी होऊन जागतिक स्तरावर मनपाचे नाव लौकीक केले. आधुनिक युगात स्पर्धेत मनपाचे विद्यार्थी मागे राहु नयेत यासाठी दोन अत्याधुनिक मोबाईल कम्प्यूटर व्हॅन, मुंबई लॉयन्स क्लबच्या सहकार्याने नि:शुल्क बायजू अॅपची व्यवस्था करण्यात येत आहे. आपल्या शहरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मनपाच्या माध्यमातून नि:शुल्क दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जनसहभागाची आवाश्यकता आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर शहरातील ७५ शाळा ७५ संस्था अथवा व्यक्तींनी दत्तक घेतल्यास ते शहरासाठी मोठे योगदान ठरेल, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या विविध कामांची प्रेरणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे हे १२५वे जयंतीवर्ष आहे. नेताजींनी आयसीएसची परीक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर चवथे क्रमांक प्राप्त करून उत्तीर्ण केली. मात्र त्यांनी इंग्रजांची नोकरी स्वीकारली नाही. पुढे महात्मा गांधी यांच्या माध्यमातून चित्तरंजन दास यांच्याशी ओळखी झाल्यानंतर कोलकात्याचे पहिले महापौर म्हणून चित्तरंजन दास यांनी त्यांच्यापुढे त्यांचे मुख्य अधिकारी होण्याचा प्रस्ताव ठेवला. सुभाषचंद्र बोस यांनी दुरदृष्टीतून नागरिकांच्या जीवनात दिलासा देऊ शकेल असे अनेक कार्य केले. त्यांचे कार्य हे आजही प्रेरणा देतात, असे ते म्हणाले. त्यावेळी प्लेगची महामारी आलेली असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या नियोजनबद्ध कार्यातून कोलकाता प्लेगसह सर्व साथीच्या रोगापासून दूर राहू शकला. वर्तमानकाळात कोरोनाचे थैमान असताना नागपूर महानगरपालिकेमध्ये आयुक्त व प्रशासनाच्या नेतृत्वात मनपाने उत्तम कार्य केले. मनपाच्या शहर बसला रुग्णवाहिका, फिरत्या चाचणी केंद्रांमध्ये परावर्तीत करून कोरोनाची दुसरी लाट थोपवून लावली. देशात १५० कोटी लसीकरण झाले असताना त्यात नागपूर शहराने पहिल्या डोसचे १०० टक्के तर दुसऱ्या डोसचे ७० टक्के लसीकरण पूर्ण करणे हे दखलपात्र आहे, असेही ते म्हणाले. केंद्र, राज्य व मनपाच्या निधीतील एकही पैसा खर्च न करता शहरातील हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात मनपाने केवळ जनसहभागातून यश मिळविले. शहराच्या आरोग्य, शैक्षणिक व अन्य विकासामध्ये जनसहभाग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सैनिकांच्या अतिथीगृहासाठी मनपातर्फे ५० लक्ष रुपये निधी
विदर्भातील विविध भागातील जवान देशाच्या सेवेसाठी सैन्यात आहेत. हे कधी रजेवर आल्यानंतर कर्तव्यावर परत जाताना रेल्वेगाडी किंवा बसची वेळ चुकल्यानंतर त्यांना बसस्टँड किंवा रेल्वे स्टेशनवर रात्र काढावी लागते. देशाच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानांना असे उघड्यावर रहावे लागू नये यासाठी मनपाने पुढाकार घेतला असून जवानांच्या निवासासाठी सेनेच्या जागेमध्ये अतिथी गृहाच्या निर्मितीसाठी मनपातर्फे ५० लक्ष रुपये देण्यात येणार असल्याचेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन मनपा शाळेतील शिक्षिका शुभांगी पोहरे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी मानले. यावेळी उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, मिलींद मेश्राम, मुख्य अभियंता प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, अजय मानकर आदी उपस्थित होते.