नागपूर: सध्या प्लास्टिकचा वापर सर्रास वाढला असून यामध्ये गाई, मासे बळी पडत आहेत. त्यामुळे प्लास्टिकचा वापर करण्यावर निर्बंध घालण्याची मागणी आमदार विदया चव्हाण यांनी विधानपरिषदेमध्ये केली.
हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे विषय २१ व्या शतकात महत्त्वाचे झाले आहेत. या विषयावर विधानपरिषदेत नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेत आमदार विदया चव्हाण यांनी सहभाग घेतला.
पंतप्रधान गाई वाचवण्य़ाची भाषा करत आहेत परंतु गाईच्या पोटात प्लास्टिकचा १४ किलोचा गोळा आढळला आहे. समुद्रातील माशांच्या पोटातही प्लास्टिक आढळत आहे. राज्याचे वनमंत्री कोटी-कोटी झाडे लावल्याचे सांगत आहेत. मात्र ती झाडे आपण पाहण्याची गरज आहे. वाढत्या प्रदूषणामुळे सध्या श्वसनाचे आजारही वाढले आहेत. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील असेही विदया चव्हाण म्हणाल्या.