नागपूर :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडले. याकरिता आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून निकाल जाहीर झाले आहेत. नागपूरच्या सहाही मतदासंघाचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत.
दक्षिण-पश्चिम नागपूरमधून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांचा विजयाचा षटकार-
विधानसभा निवडणुकीत राज्यासह देशाचे लक्ष लागून राहीलेल्या अतिशय महत्वाच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांनी दणदणीत विजय मिळवला आहे.त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांचा दारुण पराभव केला.
पश्चिम नागपुरातून काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा दणदणीत विजय –
पश्चिम नागपुरात काँग्रेसचे विकास ठाकरे हे पुन्हा एकदा बहुमताने निवडून आले आहे.भाजपच्या सुधाकर कोहळे यांना त्यांनी धूळ चारली.विकास ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली कामे आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेली प्रश्नांची जाण ही त्यांची सकारात्मक बाजू ठरली.शिवाय त्यांच्या जनसंपर्कात सातत्य आहे. त्याचा त्यांना लाभ मिळाल्याने पश्चिम नागपुरातून पुन्हा आमदार झाले आहे.
मध्य नागपुरातून भाजपच्या प्रवीण दटके यांचा विजय –
मध्य नागपुरात भाजपचे प्रवीण दटके हे बहुमताने निवडून आले आहे.काँग्रेसचे बंटी शेळके यांना त्यांनी पराभूत केले. मध्य नागपूर मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघात भाजपचे प्रवीण दटके, काँग्रेसचे बंटी शेळके व अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. मध्य नागपुरात चक्क २० उमेदवार रिंगणात होते. गेल्या तीन टर्मपासून या मतदार संघावर भाजपचे वर्चस्व होते.
पूर्व नागपुरातून भाजपच्या कृष्णा खोडपे यांनी सलग चौथ्यांदा मारली बाजी –
पूर्व नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. ही प्रतिष्ठा कायम ठेवत पूर्व नागपुरातून कृष्णा खोडपे यांनी सलग चौथ्यांदा बाजी आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) दुनेश्वर पेठे यांना त्यांनी धूळ चारली. या मतदारसंघातून कृष्णा खोपडे यांच्यासह १७ उमेदवार रिंगणात उतरले होते. परंतु त्यांना विरोधी दावेदार आणि मित्र पक्षांमधील असंतुष्टांचे आव्हान होते.. खोपडे यांच्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) आभा पांडे यांचा समावेश होता.
दक्षिण नागपुरातून भाजपचे मोहन मते विजयी –
दक्षिण नागपूर मतदारसंघातून भाजपचे मोहन मते बहुमताने विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या गिरीश पांडव यांना पराभूत केले. पांडव यांना काँग्रेसने पुन्हा एकदा दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवल्याने भाजपचे मोहन मते विरुद्ध पांडव यांच्यात अटीतटीची लढत बघावयला मिळाली.
उत्तर नागपुरात काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी राखला गड –
उत्तर नागपूर मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांनी पुन्हा एकदा गड राखला आहे. त्यांनी भाजपच्या मिलिंद माने यांना पराभूत केले. उत्तर नागपूर मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत हे २० हजार मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी ३ लाख ७५ हजार मतदानापैकी १ लाख ९३ हजार म्हणजे ५२ टक्के मतदान झाले होते. यावर्षी मतदारांचीही संख्या वाढली असल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा झाला.