Published On : Wed, Oct 20th, 2021
By Nagpur Today Nagpur News

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी

मुंबई– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार, दि. 20 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा दिनांक 22 सप्टेंबर, 2021 ते 8 ऑक्टोबर, 2021 व इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक 16 सप्टेंबर, 2021 ते 12 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून त्याची कार्यपद्धती व कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Gold Rate
Friday 24 Jan. 2025
Gold 24 KT 80,700/-
Gold 22 KT 75,100/-
Silver / Kg 91,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून इ. दहावी व इ. बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इ. दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/ शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
गुणपडताळणीसाठी गुरुवार दिनांक 21 ऑक्टोबर, 2021 ते शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर, 2021 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरूवार, दिनांक 21 ऑक्टोबर, 2021 ते मंगळवार 9 नोव्हेंबर, 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल.

सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छाया प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहीत नमुन्यात विहीत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. सन 2022 मधील इ. दहावी व इ. बारावी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांद्वारे Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्याची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील. सन 2021 मध्ये प्रथम नोंदणी करून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस पुनःश्च प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

त्यानुसार सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 च्या इ. दहावी व इ. बारावी परीक्षेस सर्व विषय घेऊन प्रथमच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन राहून पुढील सलगच्या दोन संधी उपलब्ध राहतील. सन 2022 मधील परीक्षेसाठी नोव्हेंबर-डिसेंबर 2020 सन 2021 अथवा सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणी सुधार योजनेंतर्गत आवेदन पत्र भरून परीक्षेस प्रविष्ट होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

Advertisement