मुंबई : राज्यात महसूल विभागाशी संबंधित सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर महाअभियान’ हाती घेण्यात आले आहे.
हे अभियान सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात व्यक्त केला.
बावनकुळे म्हणाले, प्रत्येक महसूली मंडळात वर्षातून चार वेळा हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिरासाठी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून, वर्षाला किमान १६०० शिबिरे घेतली जातील.
सरकारी कार्यालयातील फेरे थांबतील!
मंत्री बावनकुळे म्हणाले, राज्यातील रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जातीय प्रमाणपत्र, रेशन कार्ड वाटप, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवणे यासाठी लोकांना सरकारी कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागतात. मात्र, अभियानामुळे महसूल विभागाशी संबंधित सर्व तक्रारी आणि अर्ज एका ठिकाणी हाताळले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना महिनोंमहिने सरकारी दारात फिरावे लागणार नाही.
पहिल्यांदाच शासनाचा थेट सहभाग
गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारच्या अभियानाला शासनाचे कोणतेही आर्थिक पाठबळ नव्हते. मात्र, यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने प्रत्येक शिबिरासाठी २५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे महसूल प्रशासन अधिक प्रभावी आणि जलदगतीने काम करू शकणार आहे.