नागपूर : दुर्बल घटक समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा कांता रारोकर यांनी विविध विभागातिल अधिकाऱ्यासोबत बुधवारी (ता. १०) आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील स्व.डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे पार पडलेल्या बैठकीत दुर्बल घटक समितीचे सदस्य सर्वश्री विजय चुटेले, लहुकुमार बेहते, परसराम मानवटकर, सदस्या शिल्पा धोटे, शकुंतला पारवे, लीला हाथीबेड, विद्या मडावी, उषा पॅलट, आशा उईके, वैशाली नारनवरे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, ग्रंथालय अधिक्षक अलका गावंडे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त सुषमा मांडगे, धंतोली झोनचे सहायक आयुक्त किरण बगडे, नेहरूनगर व मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राउत, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त साधना पाटील, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, आदी उपस्थित होते.
यावेळी दुर्बल घटक समितीच्या अध्यक्षा कांता रारोकर यांनी विविध विभागात मागील आर्थिक वर्षामध्ये किती रुपयांचे काम झाले तसेच किती रुपयांचा निधी शिल्लक आहे यासंबधी आढावा घेतला. तसेच सर्व झोन अंतर्गत दुर्बल घटक समिती मार्फत कुठे काम करता येउ शकते या संदर्भात सर्व विभाग प्रमुखांना माहिती देण्यास सांगितली.
दुर्बल घटक समितीच्या अध्यक्षा कांता रारोकर यांनी दुर्बल घटक समिती अंतर्गत मागील आर्थिक वर्षातील किती रुपयांचा निधी शिल्लक आहे व किती खर्च झाला त्या संदर्भात लिखीत स्वरुपात माहिती देण्याचे निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दुर्बल घटक समितीच्या अध्यक्षा कांता रारोकर यांनी सूचित केले की, महानगरपालिकेच्या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे तसेच शाळेच्या इमारती सुध्दा जिर्ण झालेल्या आहे त्यामुळे म.न.पा. च्या शाळांचे मॉडिफिकेशन करण्याची गरज आहे. ज्या शाळेत पटसंख्या जास्त आहे तेथे वर्गनिहाय शिक्षक देण्यात यावे तसेच इंग्रजी माध्यमांचे वर्ग देखील सुरु करणे आवश्यक आहे त्या दृष्टीने शिक्षणाधिकारी यांनी कार्यवाही करावी. त्याचबरोबर सर्व झोनमध्ये मनपाच्या शाळेच्या इमारतीच्या बांधकामावर किती रुपयांचा खर्च झालेला आहे याबाबत पुढील सभेमध्ये माहिती आणण्याचे निर्देश दिले.