वसुली मोहिमेत ९० लाखाच्या वीज बिलांचा भरणा
नागपूर : बुटीबोरी येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी नुकतीच भेट देऊन वीज यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच ग्राहकांशी संवाद साधला.तसेच त्यांनी कॅन्सर रिसर्च इन्स्टिटयूटला भेट दिली. यावेळी वीज थकबाकी वसुली मोहिमे अंतर्गत औद्योगिक, वाणिज्यिक व कृषी प्रवर्गातील सुमारे ५४ ग्राहकांनी ९० लाख ६४ हजार रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला.
महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी शनिवारी २९ जानेवारीला बुटीबोरी विभागा अंतर्गत बुटीबोरी औद्योगिक वसाहत, बुटीबोरी शहर व खापरी वितरण केंद्र अंतर्गत विविध ठिकाणी भेटी दिल्या.यावेळी त्यांनी ग्राहकांशी संवाद साधला. बुटीबोरीतील कॅन्सर रिसर्च इन्स्टिटयूटला भेट देऊन या दोन्ही अधिकाऱ्यांनी तेथील वीज यंत्रणेचा आढावा घेतला.
यावेळी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी वसुली मोहिमेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. ग्राहकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांना महावितरणची परिस्थिती समजावून सांगितली व नियमित वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे,असे आवाहन केले.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत औद्योगिक, वाणिज्यिक व कृषी प्रवर्गातील सुमारे ५४ ग्राहकांनी ९० लाख ६४ हजार रुपयांचे वीज बिल उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भरले. यावेळी नागपूर शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे उपस्थित होते. उप कार्यकारी अभियंता वैभव नारखेडे, सहायक अभियंता सुनील जैन, मेहूने व शिंगाडे यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला.
फोटो ओळ: फाल्कन उद्योग समूहाकडून वीज बिलाचा धनादेश स्वीकारताना प्रादेशिक संचालक सुहास रंगारी. सोबत महावितरणचे इतर अधिकारी.