नागपूर : शहरात औरंगजेबाच्या कबरीवरून करण्यात आलेल्या आंदोलनानंतर दोन गटात संघर्ष निर्माण झाला. यानंतर नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तसेच, या दंगलीत तब्बल ३३ पोलीस जखमी झाले असून त्यात तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी असल्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज यासंदर्भात विधानसभेत केलेल्या निवेदनात अधोरेखित केली.
यावेळी नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीमध्ये एक सुनियोजित पॅटर्न दिसून येत असल्याचे विधान फडणवीस यांनी केले. नागपूर दंगलीमध्ये तीन डीसीपी जखमी झाले असून त्यातील एकावर चक्क कुऱ्हाडीनं वार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावर फडणवीसांनी विधानसभेत निवेदन देताना इशारा दिला आहे. पोलिसांवर हल्ला करणारे जे कुणी असतील, त्यांना सोडणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले. या घटनेत एक क्रेन, दोन जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली.
या संपूर्ण घटनेत ३३ पोलीस जखमी झाले आहेत. त्यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. त्यातल्या एका उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. एकूण ५ नागरिक जखमी झाले आहेत. तिघांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. दोन रुग्णालयात आहेत. त्यापैकी एक आयसीयूत असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
नागपूरमधील दंगल सुनियोजित कट –
नागपूरमधील दंगल सुनियोजित पद्धतीने घडल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. सकाळची एक घटना घडल्यानंतर पूर्णपणे शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचे समोर आले. कारण जवळपास एक ट्रॉलीभरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर जमा करून ठेवलेले दगड पाहायला मिळाले. शस्त्रंही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहे. वाहनांची जाळपोळ झाली आहे. ठरवून काही ठराविक घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसत असल्याचे फडणवीस म्हणाले.