पात्र लाभार्थ्यांनी वेळीच लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन
नागपूर: दिल्ली सोबतच उत्तर भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव व्हावा, संभाव्य धोका टाळता यावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण हे मोठे अस्त्र आहे. कोरोनाचा धोका टाळता यावा यासाठी नागरीकांनी वेळेवर लस घेऊन आपले कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
नागपूर शहरात लसीकरणासाठी पात्र असलेल्या १२ वर्षावरील सर्वांचे (१२ ते १४, १५ मे १७, १८ वर्षावरील सर्व) पहिल्या डोसचे ९८.८४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे तर या सर्व वयोगाटातील ७८.०६ टक्के दोन्ही डोसचे लसीकरण झालेले आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुस-या डोसला मिळणारा प्रतिसाद हा कमी असून हे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. पहिला डोस घेऊन दुस-या डोससाठी आवश्यक निर्धारित कालावधी पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने त्वरित दुसरा डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करण्यासाठी पुढे यावे. स्वत:सह इतरांच्याही सुरक्षेसाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचाव व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण व्हावे यासाठी विशेष लक्ष देण्यात आले. शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करून येथून नियोजनबद्धरित्या लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या सर्व कार्याचे फलीत येत्या काही दिवसात संपूर्ण लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीच्या रुपात दिसणार आहे. शहरात १८ वर्षावरील सर्वांना कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे लसीकरण केले जात आहे. तर १५ ते १७ वर्ष वयोगटासाठी कोव्हॅक्सिन आणि १२ ते १४ वर्ष वयोगटासाठी कोर्बेव्हॅक्सचे लसीकरण करण्यात येत आहे. शाळांमध्ये ही १२ ते १४ वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी लसीकरण सुरू आहे.
नागपूर शहराची लोकसंख्या सुमारे २६८५८३५ एवढी आहे. यापैकी १८ वर्षावरील १९७३५५२, १५ ते १७ वर्ष वयोगटातील १३०८४२ आणि १२ ते १४ या वयोगटातील ८४६३१ असे एकूण २१८९०२५ एवढे लसीकरणासाठी पात्र आहेत. यापैकी १८ वर्षावरील सर्व पात्र व्यक्तींचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झालेले असून शहराबाहेरील नागपुरात राहणा-या व्यक्तींनाही पहिला डोस देण्यात येत आहे. आतापर्यंत २०५०५६४ व्यक्तींनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून त्याचे प्रमाण १०३.९० टक्के एवढे आहे. तर १६४३८७२ एवढ्या व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले असून त्याचे प्रमाण ८३.३० टक्के एवढे आहे. १५ ते १७ वर्ष वयोगटात १३०८४२ लसीकरणासाठी पात्र असून यापैकी ८५५३६ जणांनी पहिला (६५.३७ टक्के) तर ६३१४५ (४८.२६ टक्के) जणांनी दोन्ही डोस घेउन आपले लसीकरण पूर्ण केले आहे. १२ ते १४ वर्ष वयोगटासाठी कोर्बेव्हॅक्सचे दोन्ही डोस देण्यात येत आहेत. या वयोगटात ८४६३१ मुले व मुली पात्र असून यापैकी २७५०१ (३२.५० टक्के) जणांनी पहिला डोस घेतला आहे तर १७७६ (२.१० टक्के) जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. १५ ते १७ वर्ष व १२ ते १४ वर्ष या वयोगटातील उर्वरीत लाभार्थ्यांनी लवकरात-लवकर लसीकरण करावे. यामुळे आपले गंभीर स्वरूपाच्या कोव्हिड आजारापासून संरक्षण होईल.
कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन्ही डोस घेउन ज्यांनी ९ महिन्याचा कालावधी पूर्ण केला त्यांच्यासाठी बुस्टर डोस देण्यात येत आहे. लसीकरणाच्या सुरूवातीच्या काळात आरोग्य सेवक, फ्रंट लाईन कर्मचारी, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि व्याधी असलेले १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिक यांना सुरक्षेच्या दृष्टीने प्राधान्याने लस खासगी रूग्णालयात देण्यात आली. यापैकी ८५९३२ जणांनी बुस्टर डोस घेतलेला आहे. एकूणच शहरातील पहिला डोस घेणा-यांचे प्रमाण ९८.८४ टक्के एवढे आहे तर दोन्ही डोस घेणा-यांचे प्रमाण ७६.०८ टक्के एवढे आहे.