नागपूर : शहरातील रामझुला पुलावर मद्यधुंद अवस्थेत भरधाव मर्सडिज कार चालवत दोन तरुणांना चिरडणाऱ्या आरोपी रितिका मालूला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी मोठा दणका दिला. न्यायालयाने रितिका उर्फ रितू दिनेश मालू यांची तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्याची विनंती अमान्य केली आहे. रितिकाने सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून अटकपूर्व जामीन मागितला होता. तो अर्ज २४ मे रोजी फेटाळण्यात आला. त्यानंतर तिने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. या प्रकरणावर आता 13 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास रामझुला पुलावररितिकाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कार चालवत दोघांना चिरडले होते. मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४, रा. जाफरनगर) असे मृत तरुणांचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुरूवातीला 304 A अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात बदल करणे गरजेचे होते. 304 दाखल करण्यासाठी पोलिसांनी पुढचे 48 तास लावले. जनतेचा आक्रोश पाहता पोलिसांनी रितिकाविरूद्ध भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), (निष्काळजीपणाने २७९ वाहन चालविणे), ३३६ , ३३८ (गंभीर जखमी करणे), ४२७ (आर्थिक नुकसान करणे) आणि मोटर वाहन कायद्यातील कलम १८४ (भरधाव वेगात वाहन चालविणे) व १८५ (दारूच्या नशेत वाहन चालविणे) या गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
Published On :
Tue, May 28th, 2024
By Nagpur Today
नागपुरात रामझुल्यावर दोघांना चिरडणाऱ्या रितिका मालूला हायकोर्टाचा दणका,तात्पुरता जामीन नाकारला
Advertisement