Published On : Wed, Feb 5th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नदी सफाई अभियानाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात

समन्वयाने काम करुन योग्य प्रकारे सफाई करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नागपूर: नागपूर शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा तिनही नद्यांच्या सफाई अभियानाला शुक्रवार ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पावसाळापूर्व तयारीच्या दृष्टीने तिनही नद्यांच्या सफाई अभियानाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.

नदी आणि नाले सफाईच्या अनुषंगाने मनपा आयुक्तांनी मंगळवारी (ता.४) आढावा बैठक घेतली. मनपा आयुक्त सभाकक्षातील बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त श्री. विजय देशमुख, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व झोनचे कार्यकारी अभियंता आणि झोनल अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी आणि नाल्यांची सफाई करण्यात येते. नद्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येतो. शहरातील नाग नदीची लांबी १६.५८ किमी, पिवळी नदीची लांबी १७.४२ किमी आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहे. यात ७ फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या नदी स्वच्छता अभियानासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आले आहे. त्यानुसार अभियानात सुरुवातीला नाग नदीच्या पात्राची अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौक आणि सेंट झेव्हिअर स्कूल ते पारडी उड्डाणपूल या तीन टप्प्यांत सफाई करण्यात येणार आहे. पिवळी नदीच्या पात्राची गोरेवाडा तलाव ते नारा दहन घाट आणि नारा घाट ते एसटीपी वांजरा या दोन टप्प्यात सफाई केली जाईल. पोहरा नदीची सहकार नगर घाट ते बेलतरोडी पूल आणि बेलतरोडी पूल ते हुडकेश्वर पिपळा फाटा पूल या दोन टप्प्यात सफाई करण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारीपासून अभियानात सुरुवातीला तीनही नद्यांच्या सात टप्प्यांची सफाई होणार आहे. यासाठी ७ पोकलेन लावण्यात येणार आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार यांनी बैठकीत दिली.

नदी सफाईचे कार्य व्यवस्थित व्हावे याकडे प्राधान्याने लक्ष देणे तसेच स्वछता कार्य जलदगतीने व्हावे यासाठी आवश्यकता भासल्यास आणखी मशीनरी लावण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.

बैठकीत नाले सफाई बाबत मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी माहिती दिली. नाले सफाईचे कार्य सुरु असून सध्या १३ नाल्यांची मशीनद्वारे आणि १५ नाल्यांची मनुष्यबळाद्वारे सफाई करण्यात येत आहे. नाले सफाई झाल्यानंतर पुन्हा त्यात कचरा जमा होउ नये यासाठी नियमितपणे सफाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. शहरातील जुने आणि खोलभागात असलेल्या पुलांमध्ये पावसाळ्यात अडचण निर्माण होते. अशा पुलांचा शोध घेउन त्याची माहिती सादर करा. या पुलांच्या पुनर्निमाणाच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

नदी आणि नाले सफाई करताना गाळ नदी पात्रात परत जाणार नाही याची काळजी घेण्याचेही निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

Advertisement