-कावरापेठ पुलाजवळील दुपारची घटना
– इतवारी रेल्वेस्थानकाहून गाडी सुटताच घडला प्रकार
नागपूर – इतवारी रेल्वेस्थानकाहून गाडी सुटल्यानंतर काही वेळातच चार ते पाच लुटारू गाडीत चढले. प्रवाशांना धमकी दिली, मारहाण केली. लुटपाटीचा प्रयत्न केला. मात्र प्रवाशांची संख्या अधिक असल्याने आरोपी घाबरून पळाले. ही घटना सोमवारी दिवसाढवळ्या कावरापेठ पुलाजवळ शालिमार एक्सप्रेसमध्ये घडली.
कुर्ला-हावडा शालिमार एक्सप्रेस इतवारी रेल्वेस्थानकाहून सोमवारी दुपारी 1.47 वाजता निघाली. पश्चिम बंगालचे काही कामगार एस-8 डब्यातून प्रवास करीत होते. गाडी कावरापेठ पुलाजवळ, शांतीनगर परिसरात आउटरवर असताना गाडीची गती कमी झाली. ही संधी पाहून चार ते पाच लुटारू एस-8 डब्यात चढले. काही कळण्याआधीच त्यांनी प्रवाशांना धमकी दिली, मारहाण केली. एका प्रवाशाचा मोबाईल हिसकला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवासी घाबरले. मात्र प्रवाशांची संख्या अधिक असल्याने आणि त्यांनी एकजूट दाखविताच आरोपी पळून गेले.
या घटनेची माहिती गाडीतील गार्डला मिळाली. त्यांच्या माध्यमातून लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफला माहिती देण्यात आली. तातडीने इतवारी लोहमार्ग पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र तोपर्यंत गाडी निघून गेली होती. या घटनेची माहिती गोंदिया लोहमार्ग पोलिसांना मिळाली. लोहमार्ग पोलिसांचे एक पथक शालिमार एक्सप्रेसच्या एस-8 बोगीतील पीडित प्रवाशांना भेटले. मात्र त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला.
लुटारू आमचे पैसे किंवा सामान घेऊन गेले नाही. त्यामुळे आता काय तक्रार करायची, असे म्हणत पुढील प्रवासाला निघाले. पोलिसांनी त्यांची समजूत काढली. अशा प्रकारामुळे आरोपींची हिंमत वाढेल, पोलिसांनी प्रवाशांना विश्वास दिल्याने एक प्रवासी तक्रार देण्यासाठी तयार झाला. मात्र त्यासाठी पोलिस ठाण्यात थांबावे लागेल. या प्रक्रियेत बराच वेळ जाईल, त्यामुळे त्यानेही तक्रार देण्यास नकार दिला. तुम्ही ज्या ठिकाणी उतराल तिथे तक्रार द्या, असे सांगून पोलिस निघाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी इतवारी आणि गोंदिया पोलिस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे.