मुंबई : इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणे आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा गुन्हा असलेला प्रशांत कोरटकर याला सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात अटक केली होती. त्यानंतर प्रशांत कोरटकर याला मंगळवारी सकाळी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
यानंतर प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी विधानसभेत भाष्य केले. कोरटकरच्या अटकेला झालेला विलंब हे नागपूर पोलिसांचे अपयश असल्याची टीका मिटकरी यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह बोलणाऱ्या आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मालमत्तेवर बुलडोजर फिरवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कोरटकरला तेलंगणामध्ये पकडले. या प्रकरणात आपला राज्य सरकारच्या गृहखात्यावर कोणताही आक्षेप नाही. तसेच देवेंद्र फडणवीसांवर या प्रकरणाचे खापर फोडणं देखील चुकीचं आहे. मात्र, नागपूर पोलिसातील काही जणांवर आपला संशय आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीची आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे मिटकरी म्हणाले.