नागपूर : हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का ? याच सभागृहात डिसेंबर २०१७ मध्ये जाहीर केलेले कापसाच्या बोंडअळीच्या नुकसान भरपाई पोटी ३७ हजार ५०० रूपये आणि धानावर आलेल्या तुडतुडया रोगाची नुकसान भरपाई कधी देणार ते सांगा आणि नंतरच कामकाज करा असा सवाल करीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेसच्या सदस्यांनी कापसाच्या बोंडअळीची नुकसान भरपाई तसेच धानावर पडलेल्या रोगाच्या नुकसान भरपाईचा प्रश्न लावून धरला. कामकाज सुरू होताच कापसाच्या बोंडअळीचे आणि धानाच्या नुकसान भरपाईची रक्कम केव्हा देणार असा प्रश्न विरोधी सदस्यांनी केला.
याबाबत नियम 289 अन्वये स्थगन प्रस्ताव उपस्थित करून सभागृहात दिलेल्या आश्वासनाची सरकारला पुर्तता करायची नसेल तर कामकाज तरी करून काय उपयोग असा प्रश्न उपस्थित करतानाचा हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का? असा सवाल केला मुंडे यांनी केला.
डिसेंबर २०१७ मधील अधिवेशनात बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटी ३७ हजार ५०० रूपये जाहीर करून दोन-दोन हजार रूपये देवून शेतकऱ्यांची फसवणूक करता का ? असा आक्रमक सवाल केला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या मागणीला पाठिंबा देत जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज सभापतींनी सुरूवातीस अर्धा तास स्थगित केले.
त्यानंतरही धनंजय मुंडे यांनी आपली मागणी कायम ठेवल्याने पुन्हा सभागृहात अर्धा तासासाठी आणि त्यानंतरही हीच मागणी कायम राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले.