नागपूर: गेल्या सत्तर वर्षात देशात सरकार बदलल्यामुळे फक्त माणस बदलली धोरणं मात्र परदेशातून नकल केलेलीच कायम आहेत अशी टिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच भाग असणाऱ्या भारतीय मजदुर संघाने केली आहे. जेटली असो किंवा आणखी कुणी असो आर्थिक धोरण नापास असून ते कामगार आणि सर्वसामान्यांच्या विरोधात असल्याची टिका भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री ब्रिजेश उपाध्याय यांनी केली आहे.
केंद्र सरकारने वेगवेगळ्या फोरमवर परदेशात शिकलेले योग्यता नसलेले अनेक अडव्हायझर्स भरले आहेत त्यामुळे शेतकरी, कष्टकरी लोकांची परवड होत आहे असेही भामसंचे राष्ट्रीय महामंत्री ब्रिजेश उपाध्याय यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने विरोधी भूमिका घेणाऱ्या भारतीय मजदुर संघाची अखिल भारतीय प्रतिनिधींची बैठक नागपूरात पार पडली पडली. यावेळी १७ नोव्हेबरला केंद्र सरकारच्या विरोधात संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चाची रुपरेशा ठरवली गेली. केंद्र सरकारचे धोरण कामगार विरोधी असल्याच मत भारतीय मजदुर संघाने यापुर्वीच व्यक्त केले आहे.