नागपूर : सीटबेल्ट न बांधता चारचाकी चालविणे वाहन चालकांना महागात पडले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सीटबेल्ट न लावता वाहन चालवणाऱ्यांचा परवाना निलंबित करण्यास सुरुवात केली आहे. चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्ट लावणे नियमानुसार बंधनकारक असून वाहन चालकांकडून त्याचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे.
नागपूर वाहतूक पोलिसांच्या शिफारशीनुसार, नागपूर शहर आरटीओने यावर्षी 515 चुकीच्या चारचाकी वाहनचालकांचे वाहन चालविण्याचा परवाना निलंबित केला आहे.
उल्लंघन करणाऱ्यांना दंड करण्याबरोबरच, डीसीपी चेतना तिडके यांच्या नेतृत्वाखालील वाहतूक पोलिसांनी चारचाकी वाहनचालकांचा परवाना किमान तीन महिन्यांसाठी निलंबित केला. आरटीओने प्रथमच सीटबेल्ट नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा परवाना निलंबित करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सहाय्यक आरटीओ हर्षल डाके म्हणाले की, नियमांचे उल्लंघन करणार्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात आला आहे कारण त्यांच्यावर याअगोदरही अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केले आहे.
दरम्यान दर महिन्याला वाहतूक पोलिस वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यासाठी आरटीओकडे उल्लंघन करणाऱ्यांची यादी पाठवतात. याशिवाय आरटीओही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने निलंबित करते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमुळे रस्त्यावरील अपघात होतात. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी नियमभंग करणाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात येत असल्याचे डाके म्हणाले.