नागपूर : उमरेड-कऱ्हांडलाचे जंगलात आता रुबाबदार अशा ‘पाटील’ नावाच्या वाघाचे आगमन झाले आहे. मागील दीड वर्षांपासून हा वाघ या जंगलात भ्रमंती करत असून तो पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या वाघाला पाहाण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांना जंगल सफारी करणारे टुरिस्ट गाईड आकाश गेडाम यांनी पहिल्यांदा या ‘पाटील’ वाघाचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपले.
हा वाघ गोठनगाव क्षेत्रातून जंगलात आल्याचे गेडाम म्हणाले. तसेच हा शांत स्वरूपाचा असा लाजाळू वाघ असून पर्यटकांनी भरलेली गाडी बघताच झाडा-झुडपात लपतो.
आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी उमरेड-कऱ्हांडला- पवनी अभयारण्याला भेट दिली. मात्र, पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या जय वाघाच्या मृत्यूनंतर पर्यटकांची संख्या रोडवली होती. आता या अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळच ‘पाटील’ वाघाच्या आगमनामुळे पर्यटकांची उत्सुकता शिगेला पाहोचली आहे.
मार्गदर्शक (टुरिस्ट गाईड) आकाश गेडाम विदेशी पर्यटकांना घेऊन अभयारण्यत भ्रमंतीवर घेऊन गेले असता रुबाबदार वाघ त्यांना दिसला. या वाघाच्या दर्शनाने भारावलेल्या विदेशी पर्यटकांच्या चेहरे प्रफुल्लीत झाले. गेडाम यांनी हे अविस्मरणीय दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. या वाघाचा रुबाबदार थाट, बांधा आणि त्याच्या चालण्याच्या शैलीवरून या वाघाला पर्यटकांनीच ‘पाटील’ असे नाव दिल्याचे गेडाम यांनी ‘नागपूर टुडे’शी बोलतांना सांगितले.
दरम्यान जून 2012 मध्ये उमरेड कऱ्हांडला अभयारण्याची घोषणा झाली. नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही आणि भंडाऱ्यातील पवनीचा एकूण 189. 30 चौरसकिलो मीटरचे क्षेत्र अभयारण्यात समाविष्ट आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) जारी केलेल्या निर्देशानुसार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात जंगल सफारी आजपासून म्हणजेच 4 जुलै 2023 पासून पुन्हा सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर पर्यटकांना 4 जुलैपासून सफारी ऑफलाइन बुक करा आणि पुन्हा एकदा जंगल सफारीचा आनंद घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.