नागपूर : आमदार निवासातील अत्याचार प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शासन करावे, अशी मागणी नागपूर महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे यांनी केली.
आमदार निवास येथे झालेल्या एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस उपनिरीक्षक यांची भेट घेतली आणि घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी उपसभापती श्रद्धा पाठक, सदस्य वंदना भगत आदी उपस्थित होते.
पीडित मुलीचे संगोपन तसेच वैद्यकीय उपचार हे महिला बाल कल्याण समितीद्वारे करण्यात येईल. त्याच प्रमाणे तिचे सुमपदेशन देखील करण्याचे त्यांनी जाहीर केले. याशिवाय त्या भागातील पोलिस गस्तसुद्धावाढविण्यात यावी, अशी सूचना देखील त्यांनी पोलिस विभागाला केली.
याप्रसंगी नगरसेविका अंसारी, महिला आघाडीच्या कल्पना पाजारे, रेखा दैने, सुनिता मौंदेकर आदी उपस्थित होते.