नागपूर: गामीण भागातील वीज ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे निराकरण त्वरीत करण्यासाठी ग्राम विदुयत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात येत असून त्यांना ग्राहकांच्या मीटरवरील वीज वापराची नोंद घेणे, खंडित वीज पुरवठा सुरळीत करणे, थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणे या सारखी कामे करायची आहे. तीन हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात त्यांची नियुक्ती करण्यात येत असून ग्राम विदुयत व्यवस्थापक महावितरण आणि वीज ग्राहक यांच्यात दुवा म्हणून काम करतील असा विश्वास महावितरणचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे यांनी व्यक्त केला.
महावितरण आणि राज्य शासनाच्या कौशल्य विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यात नियुक्त करण्यात येणा-या ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या पहिल्या तुकडीच्या एका महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घ्याटनाप्रसंगी ते बोलत होते. प्रकाश भवन, नागपूर येथील महावितरणच्या लघु प्रशिक्षण केंद्रात दरमहा ३० जणांच्या तुकडीला प्रशिक्षण देण्यात येणार असून यात एका आठवड्याचे सैद्धांतिक प्रशिक्षण तर तीन आठवड्यांचे प्रत्यक्ष वीजवाहीवर व्यावहारिक प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. जिल्ह्यातील एकूण ६०० जणांना येथे आगामी काळात प्रशिक्षण देण्याचे नियोजित आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण करणा-यांना आगामी काळात विदुयत विभागाकडून परवाना देण्यात येणार आहे. ग्राम विदुयत व्यवस्थापकांवर महावितरणचे तांत्रिक नियंत्रण राहणार असून प्रशासकीय नियंत्रण स्थानिक ग्राम पंचायतींचे राहणार आहे. त्यांना देण्यात येणा-या प्रशिक्षणाच्या आधारे त्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याने या संधीचे सोने करण्याच्या सुचनाही चंद्रशेखर येरमे यांनी यावेळी केले.
ग्राम विदुयत व्यवस्थापकांनी महावितरण कडून देण्यात येणारे तांत्रिक प्रशिक्षण मन लावून पूर्ण करण्याचे आवाहन नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना केले. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना प्रत्यक्ष गावात जावून काम करायचे असून विजेच्या क्षेत्रात चुकीला माफी नसल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे खंडाईत यांनी विशेष लक्ष वेधले.
ग्रामीण भागामध्ये महावितरण मार्फत पुरविण्यात येणा-या सेवेसाठी जनमित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, यामध्ये बिघाड झाल्यास किंवा दुरुस्ती करायची असल्यास तातडीने सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातच अडचणींचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापक निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामविकास विभागातर्फे घेण्यात आला आहे.
त्यानुषंगाने ग्रामपंचायत फ्रेन्चायझी म्हणून काम करणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीमार्फत आयटीआय झालेल्या उपयुक्त व क्षमता असलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या राज्यात २३ हजार ग्रामविद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. गावामध्ये उद्भवणार्या विद्युतविषयक अडचणींचे निराकरण तातडीने करणे शक्य व्हावे, यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामविद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुषंगाने ग्राम विकास विभागातर्फे ग्रामपंचायतींनी फ्रेन्चायझी म्हणून काम करणार आहे.
याप्रसंगी महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, मुख्य अभियंता (समन्वय) पाटील, संचालक (ग्राहक व्यवहार) गौरी चंद्रायण, कौशल्य विकास सोसायटीचे सहाय्यक संचालक प्रविण खंडारे आदी मान्यवरांनीही यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना अधिक्षक अभियंता मनिष वाठ यांनी, संचालन जयंत पैकीने यांनी तर जयेश कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी महावितरणचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.