मुंबई/इंदोर (Mumbai/Indore): हायप्रोफाईल संत भय्यू महाराज पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर दीड वर्षांनी ते पुन्हा एकदा लग्नच्या बेडीत अडकत आहेत. सुर्योदय परिवाराशी संबंधीत ग्वालियरच्या डॉ. आयुषी शर्मा यांच्यासोबत ते विवाहबद्ध होत आहेत. हा विवाह 30 एप्रिल रोजी सिल्वर स्प्रिंग क्लब हाऊसमध्ये सायंकाळी 7 वाजता पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी दोन्ही कुटूंबातील अगदी जवळच्या व्यक्तीच उपस्थित असतील.
सध्या भय्यू महाराजांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियातून जोरदार चर्चेत आहे. सुरूवातीला त्यांच्या दुसऱ्या लग्नाबाबतची माहिती काही निवडक लोकांनाच होती. दरम्यान, सुर्योदय परिवाराचे ट्रस्टी तुषार पाटिल यांनी या बातमीला दुजोरा दिला असून, हा निर्णय त्यांच्या कुटूंबियांच्या संमतीनेच घेतल्याचे सांगीतले.
भय्यू महाराज का करतायत दुसरे लग्न?
सद्गुरू दत्त धार्मिक व परमार्थिकी ट्रस्टच्या अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भय्यू महाराजांनी त्यांच्या आईच्या सांगण्यावरून दुसऱ्यां लग्नाचा निर्णय घेतला. दोन वर्षापूर्वीच भय्यू महाराजांच्या वडिलांचे निधन झाले. तर, नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांची पहिली पत्नी माधवी हिचे निधन झाले. त्यांची पहिली पत्नी औरंगाबत येथील होती. भय्यू महाराजांना माधवी यांच्यापासून झालेली एक मुलगी आहे. सध्या ती 15 वर्षांची असून, कुहू असे तिचे नाव आहे. तिने पुण्यातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.