मुंबई : मुख्यमंत्र्यांनी राज्याचे कामगारमंत्री संभाजी निलंगेकरांचा राजीनामा घ्यावा…मंत्री म्हणून राजीनामा घेता येत नसेल तर त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
लातुरमध्ये शैक्षणिक क्लासेस चालवणाऱ्या अविनाश चव्हाण यांची रविवारी गोळया झाडून हत्या झाली. त्या हत्येमध्ये संभाजी निलंगेकर यांच्या बॉडीगार्डला अटक करण्यात आली. त्यावर आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत संभाजी निलंगेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर तोफ डागली.
राज्यात मंत्र्यांच्या माध्यमातून गुंडाच्या टोळया काम करत असून मुख्यमंत्र्यांनी जंगलराज निर्माण केल्याचा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी केला.
संभाजी निलंगेकरांचा बॉडीगार्ड करणसिंह याला अटक झाल्यावर मंत्रीमहोदयांनी मी त्याला ओळखत नाही असं सांगितलं परंतु त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी तो माझा बॉडीगार्ड नाही आणि तो पक्षातही नाही असे स्पष्टीकरण दिले. मात्र मंत्री असं बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करतानाच नवाब मलिक यांनी करणसिंह याचे निलंगेकरांसोबत असलेले फोटो मिडियासमोर ठेवले.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये करणसिंह याच्याकडे कारबाईन कशी आली, ही कारबाईन त्याच्याकडे आली कुठुन, मंत्रीमहोदयांच्या बंगल्याबाहेर ही कारबाईन घेवून त्याने फोटो काढले आहेत. अशा किती कारबाईन आहेत असे प्रश्न उपस्थित होत असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.