नागपूर : भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान (वय ३४, रा. अवस्थीनगर) यांच्या हत्याकांडाचे गूढ अद्यापही कायम आहे. महत्त्वाचे म्हणजे सना यांचा मृतदेह अद्यापही पोलिसांना मिळालेला नाही. यापार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी सना खान यांच्या हत्येतील मुख्य आरोपी अमित शाहूच्या नार्को टेस्टसाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याची माहिती दिली.
यासंदर्भात पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सना हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी सूत्रधार अमित ऊर्फ पप्पू शाहू, त्याचा मित्र राजेश सिंग, धमेंद्र यादव, धमेंद्रचे वडील रब्बू चाचा ऊर्फ रविशंकर यादव व कमलेश पटेल या पाच जणांना अटक केली. आरोपी अमित शाहू याच्या नार्को टेस्टसाठी नागपूर पोलिसांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
न्यायालयाच्या सुनावणीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे मदने म्हणाले. दरम्यान सना खानचा मृतदेह अद्यापही न मिळाल्याने नागपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांची तीन पथके सना हीच मृतदेह शोधण्यासाठी जबलपूरला रवाना झाल्याची माहिती आहे.