नागपूर : जबलपूर येथील अमित उर्फ पप्पू शाहू याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खानची हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला जबलपूरवरून शनिवारी नागपुरात आणले.
अमित ऊर्फ पप्पू शाहू याने आपल्या साथीदारासोबत सना खान हिचा खून केला. सनाचा मृतदेह हिरन नदीत फेकून पुरावा नष्ट केला. हत्याकांडाला आठ दिवसांचा कालावधी झाल्यानंतरही पोलिसांना सना खान यांचा मृतदेह सापडला नाही. सना यांचा मृतदेह मिळून न आल्यामुळे नागपूर आणि जबलपूर पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सना खानशी संपर्क तुटल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये तिची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मानकापूर पोलिसांचे एक पथक जबलपूरला रवाना झाले. शाहू आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी जबलपूर पोलिसांनी नागपूर पोलिसांना सहकार्य केल्याची माहिती आहे. शाहूचे लोकेशन गोरा बाजार भागात ट्रेस करण्यात आले. अगोदर त्याच्या साथीदाराला अटक कारण्यात आली. शाहूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेचा पुढील तपास मानकापूर पोलिसांनी सुरु केला.