नागपूर. शेंदुरजना घाट वरुड अमरावती येथे झालेल्या विदर्भ महिला कुस्ती स्पर्धेत नागपूरकर आकांक्षा चौधरी हिने विदर्भाची पहिली महिला ‘विदर्भ केसरी’चा खिताब पटकावून नागपूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. तर अंशिता मनोहरे हिने दमदार कामगिरीच्या बळावर नागपूर शहर कुस्ती संघाला सांघिक विजेतेपद पटकावून दिले. नागपूर शहरासाठी अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल शहराचे माजी महापौर तथा खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक श्री. संदीप जोशी यांनी आकांक्षा आणि अंशिता यांचे अभिनंदन केले.
विदर्भ कुस्ती असोसिएशन आणि अमरावती जिल्हा कुस्ती असोशिएनच्या मार्गदर्शनात बाजीप्रभू क्रीडा मंडळाद्वारे विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत आपल्या उल्लेखनीय खेळीने आकांक्षा चौधरीने प्रतिस्पर्धीला नमवून विदर्भ केसरीचा बहुमान पटकाविला. स्पर्धेत नागपूर शहर आखाडा संघटनेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत सर्वसाधारण विजेतेपद सुद्धा नावावर केले.
सर्व खेळाडूंचे यश हे शहरासाठी अभिमानास्पद बाब असून पुढील स्पर्धांमध्येही खेळाडू आपल्या कामगिरीने नागपूर आणि विदर्भाचे नाव गौरवांकीत करतील, अशा शब्दांत माजी महापौर तथा खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक श्री. संदीप जोशी यांनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.