नागपूर: नागपूर महानगरपालिका व रोटरी कल्बच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या माध्यामिक शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना सॅनटरी नॅपकीनचे वाटप करण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमाची सुरूवात सोमवारी (ता.१९) गांधीनगर येथील वाल्मिकीनगर शाळेतून झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदा जिचकार उपस्थित होत्या.
यावेळी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेविका ऋतिका मसराम, नगरसेवक अमर बागडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, रोटरी क्लबच्या वर्षा जावंदिया, रमिला मेहता, मेघना खेमका, डॉ.चारू बाहेती, मधुबाला सारडा, नरेश जैन, पियुष फतेपुरिया, प्रमोद जावंदिया प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणल्या, मनपातील विद्यार्थिनी गरीब घरातील आहे. त्यामुळे त्यांना सॅनटरी नॅपकीनचे महत्त्व कळणे गरजेचे आहे. याबाबत पालकांनी जागरुक राहणे महत्त्वाचे आहे. मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. त्याच्याविषयी कोणतीही भीती मनात बाळगू नये, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले. रोटरी क्लबच्या माध्यमातून मनपाच्या सर्व शाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीनचा एक वर्षाचा स्टॉक मोफत देण्यात येणार आहे. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी रोटरी क्लबचे आभार मानले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत मुख्याधापिका व शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कमला मंगवानी यांनी केले. आभार रजनी परिहार यांनी मानले.
झोननिहाय सॅनिटरी नॅपकिन वाटपाचा कार्यक्रम २३ मार्चपर्यंत चालणार आहे. मंगळवार २० मार्च रोजी हनुमाननगर व धंतोली झोनअंतर्गत येणाऱ्या शाळेतील विद्यार्थिनींना दुर्गानगर माध्यमिक शाळेत, २१ मार्च रोजी नेहरूनगर व गांधीबाग झोनअंतर्गत येणाऱ्या शाळांतील विद्यार्थिनींना पन्नालाल देवाडिया हिंदी माध्यमिक शाळेत, २२ मार्च सतरंजीपुरा व लकडगंज झोनअंतर्गत येणाऱ्या शाळांतील विद्यार्थिनींना संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा येथे तर आसीनगर आणि मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या शाळांतील विद्यार्थिनींना एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात येणार आहे.