महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित बांगर यांची माहिती
नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम तीन टप्प्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन सोमवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, लता काडगाये, राजकुमार साहू, अमर बागडे, वंदना यंगटवार, माधुरी ठाकरे, अभिरूची राजगिरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरिश राऊत, गणेश राठोड, सुभाष जयदेव, आरोग्याधिकारी डॉ.सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी या मोहिमेविषयी सांद्यत माहिती सांगितली. ही मोहिम तीन टप्प्यात असून 18 सप्टेंबर रोजी या मोहिमेची सुरूवात सर्व प्रभागापासून करण्यात येईल. सर्व प्रभागामध्ये स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीची जनजागृती करणारी रॅली आयोजित करण्यात येणार आहे. त्यांनतर प्रभागामध्ये श्रमदान चळवळ करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार असून ज्या संस्था चांगल्या रितीने काम करताना दिसून येणार आहे, त्यांना महापौर उत्कृष्ट स्वयंसेवी संस्था पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठिकठिकाणी आपल्याला प्लास्टिक पडलेले दिसते. ते टाकाऊ प्लास्टिक वापरू न ये याबाबत नागरिकांना आवाहन करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी बोलताना दिले. शहरातील मोठ्या प्रमाणावर लोक सहभागातून श्रमदान करून मिळवेलेल प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही महापौर म्हणाल्या.
नागपूर महानगरपालिकेमध्ये शासन निर्णयानुसार बंद करण्यात आलेल्या प्लास्टिकवर कार्यवाही करण्यासाठी उपद्रव शोध प्रतिबंध पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, असा ईशारा महापौरांनी यावेळी दिला. पहिल्यांदा गुन्हा केल्यास पाच हजार रूपये, दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास दहा हजार रूपये, तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास 25 हजार रूपये दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल, असेही महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. प्लास्टिक मुक्त नागपूर या संकल्पनेसाठी नागपूर महानगरपालिका सदैव तत्पर असते, नागरिकांनी या लोकसहभागामध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यापुढे नागपूर महानगरपालिकेचे मुख्यालय, सर्व झोन कार्यालये, मनपाचे दवाखााने, शाळा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकवर त्यांनी प्रतिबंध टाकावा, असे मी महापौर म्हणून आवाहन करते, असेही त्या यावेली म्हणाल्या.
यावेळी आयुक्त अभिजित बांगर यांनी कचरा विलगीकरणासंदर्भात अनेक तक्रारी येत असल्याचे सांगितले. यानंतर कचरा संकलन करण्याऱ्यांनी जर कचरा विलगीकरण न करता नेला तर त्यावर दंड आकारण्यात येईल, असा ईशारा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला. सर्व झोनल अधिकारी यांनी यावर विशेष लक्ष देऊन ही कार्यवाही पूर्ण होते की नाही, हे बघावे, असेही म्हणाले.
सर्व झोनमधील ज्या ठिकाणी कचरा जास्त जमा होतो. त्या ठिकाणीची यादी झोनल अधिकाऱ्यांनी सहायक आयुक्तांमार्फत माझ्याकडे देण्यात यावी, घरी घरी जाऊन कचरा संकलन करणारी यंत्रणा ज्या ठिकाणी कमकुवत आहे. त्या ठिकाणी ती परिपूर्ण करण्याचा प्रय़त्न असेल, असेही आय़ुक्त यांनी सांगितले. ज्या ठिकाणी नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात त्या ठिकाणी सिसीटिव्ही लावून किंवा उपद्रव शोध प्रतिबंध पथकाकडून कारवाई करण्यााचे निर्देश आय़ुक्तांनी दिले.
मंगल कार्यालये, हॉटेल्स किंवा घऱगुती कचऱ्यातून निघणारे फुड वेस्ट हे वेगळे संकलित करण्याची व्यवस्था असावी, या वेस्टपासून बायोसिएऩजीची निर्मािती करता येईल. कचरा जाळण्याच्या संदर्भातील मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहे. कचरा जाळण्यावर उपद्रव शोध प्रतिबंधक पथकाने काय करावे, यासंदर्भातील सूचना झोन सहायक आयुक्तांनी त्यांना द्यावा, असे निर्देश आयुक्तांनी केले.
शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सहायक आयुक्तांनी एक विशेष मोहिम आखण्यात यावी, असेही सांगितले. पथविक्रेत्यांवर लक्ष ठेवत त्यांनी कचरा पेटी ठेवली की नाही, कचऱ्याची विल्हेवाट ते कशी करतात, याकडेही त्यांनी लक्ष देण्याचे निर्देशित केले.
बैठकीला, जयंत पाठक, लिना बुधे, अनसूया छाब्राणी, ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल उपस्थित होते.