Published On : Sat, Apr 9th, 2022
By Nagpur Today Nagpur News

संस्कृत ही लोकाभिमुख भाषा बनावी : ना. गडकरी

Advertisement

‘पंकजश्री’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

नागपूर: संस्कृत ही प्राचीन भाषा आहे. अनेक भाषांची गंगोत्री संस्कृत आहे. ही भाषा लोकाभिमुख भाषा बनावी. तसेच जोपर्यंत ही भाषा आधुनिक ज्ञानाची होणार नाही, तोपर्यंत तिचा प्रचार आणि प्रसार होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे ‘पंकजश्री’ या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ना. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. पंकज चांदे, कुलसचिव रामचंद्र जोशी, प्रा. कविता होले, प्रा. डॉ. नंदा पुरी व अन्य उपस्थित होते. डॉ. पंकज चांदे यांचा आणि माझा जुना परिचय आहे. नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागात प्राध्यापक असताना त्यांचा माझा संबंध आला. संस्कृत भाषेचे महत्त्व भारतीय समाजाला समजावण्यात आपण कमी पडलो अशी खंतही ना. गडकरी यांनी व्यक्त केली.

Advertisement

संस्कृत भाषेमध्ये आपल्यापेक्षा अधिक संसोधन व अध्ययन जर्मनीमध्ये सुरु असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आगामी काळात संस्कृतबद्दलचे ज्ञान जनतेपर्यंत पोहोचोवणे ही भारतीय समाजाची आवश्यक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे या विद्यापीठासाठी बहुमूल्य योगदान आहे. या विद्यापीठाचा प्रारंभीचा काळ कठीण होता. डॉ. पंकज चांदे हे संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु झाल्यानंतर व नंतरच्या कुलगुरुंनीही या विद्यापीठाला लोकाभिमुख बनविण्यासाठी चांगले योगदान दिले. डॉ. चांदे यांनी अनेक गोष्टी विद्यापीठात घडवून आणल्या.

असे असले तरी संस्कृत ही लोकाभिमुख भाषा कशी बनवणार, संस्कृत ही सर्वसामान्याची भाषा कशी होणार, विद्यार्थ्यांचा संस्कृतकडे ओढा कसा वाढणार, संस्कृत साहित्यात उपलब्ध असलेले ज्ञानाचे भांडार लोकांपर्यंत कसे पोचणार, काळाच्या ओघात झालेला बदल आणि स्थित्यंतरे लक्षात घेऊनच शिक्षणाच्या, शिक्षण अभ्यासक्रमात शिकविण्याचा विचार करावा लागणार असल्याचेही ते म्हणाले.

ज्ञान जेवढे महत्त्वाचे आहे, त्यासोबतच ज्ञानाचे सादरीकरणही महत्त्वाचे आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- ज्ञानाचे सादरीकरण करताना त्याचा वर्तमानाशी कसा संबंध आहे, या ज्ञानाचा उपयोग कसा होऊ शकतो, याचा विचार करणे आवश्यक आहे. आयुर्वेद, योगविज्ञान व संस्कृतची योग्य सांगड घालून त्याचा फायदा सर्वसामान्यांना कसा होईल, याचा विचारही विद्यापीठाने करावा. तसेच संपूर्ण ज्ञान संस्कृतमध्ये व्यावसायिक दृष्टीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. ज्ञान मांडण्याची पध्दती ही प्रभावी असेल तरच ते लोकाभिमुख होईल असा विश्वास व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- आपल्या पाल्याने संस्कृत शिकले पाहिजे, अशी भावना पालकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. पण अशी भावना निर्माण झाल्याचे दिसत नाही, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले