नागपूर: शेती आणि शेतीशी संबंधित पुरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसायाची मागणी वाढली आहे. त्यामुळे अधिकांश शेतकरी या व्यवसायाकडे वळतांना दिसत आहेत. परंतू , शेतीचा विकास हा पर्यायाने शेतकऱ्याचा विकास मानला जातो. तसेच दुग्ध व्यवयाचा विकास करायचा असेल तर त्यास बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून शेती आणि दूध उत्पादनात वैज्ञानिक क्रांती आणण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी सर्व संपन्न होऊन येथील आत्महत्या थांबविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग व जहाज बांधणी आणि जल संपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या वतीने आज एक दिवसीय विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प वैज्ञानिक पशू संगोपन पद्धतीवर शेतकरी अभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे, विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचे संचालक रविंद्र ठाकरे, राष्ट्रीय डेरी विकास बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ, कार्यकारी संचालक वाय. वाय. पाटील आदी उपस्थित होते.
विदर्भात आजही पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळे जमीनीचा कस कमी होऊन सेंद्रीय कार्बन कमी होत आहे. कंपोस्ट खत, गांढूळ खत, शेणखत अशा सेंद्रीय संसाधनांचा वापर केल्यास जमीनीची गुणवत्ता व उपजाऊपणा वाढविण्यास मदत होईल.
जमीनीचा कस हा शेतीसाठी उपयुक्त असतो. त्याचबरोबर शेतीला पाण्याचीही आवश्यकता असते. पाण्यामध्ये असणारे क्षार व तसेच मानवी व पशूच्या शरीरास घातक रासायनिक द्रवे नष्ट करून पाण्याचा वापर केला तर तो शेती व जनावरास फायदेशीर ठरतो. विशेषकरून दुधारू जनावरांना जास्तीत-जास्त शुद्ध व स्वच्छ पाणी दिल्यास दुधाचे गुणवत्तापूर्वक उत्पादन वाढविण्यास मदत मिळते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी पाण्याची नियमित चाचणी केल्यास उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळेल.
सिंचन प्रकल्पांची माहिती देतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जास्तीत जास्त पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे याकरिता केंद्र शासनाने 15 हजार कोटी रुपये मंजूर करून 108 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विदर्भातील 83 प्रकल्पाचा समावेश असून 26 मोठे सिंचन प्रकल्प देखील सुरु करण्यात येणार आहे.
पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध चाऱ्याची प्लास्टीकच्या सहाय्याने साठवण करणे, प्रोटीनयुक्त चाऱ्याकरिता मका, धान, जवस, सरकी, सोयाबीन ची ढेप यासारख्या शेतीतील उत्पादनाचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना त्यांनी दिला. शिवाय येणाऱ्या काळात मदर डेअरीच्या माध्यमातून दुधारु जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
विदर्भ, मराठवाड्यात दूध उत्पादन अधिक असले तरी मार्केटींगची व्यवस्था नसल्याने विमान वाहतूक तसेच वर्धेजवळ तयार करण्यात आलेल्या ड्रायपोर्ट द्वारे विदर्भातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना परदेशी मागणी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. ही बाब लक्षात घेता मदर डेअरीने चिल्लर दुध विक्री केंद्र लवकरात लवकर सुरु करावे तसेच सरकारी दूध विक्री केंद्र हे माजी सैनिकांना, संस्थांना द्यावेत. विदर्भात मदर डेअरीचे उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.
27 हजार 326 दूध उत्पादक
विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून दोन्ही विभागातील 3 हजार 23 गावांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यत दूध विकासाला चालना देत 27 हजार 326 शेतकऱ्यांच्या खात्यात 150 कोटी रुपये जमा करण्यात त्यांना दूध उत्पादक म्हणून नावलौकीक मिळत आहे. 1 हजार 378 गावांमध्ये सध्या 952 दूध संकलन केंद्र असून विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध क्रांती होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची प्रस्तावना मांडतांना दिलीप रथ यांनी विदर्भातील 6 आणि मराठवाड्यातील तीन अशा 9 जिल्ह्यातील 1400 गावांमध्ये 27 हजाराहून अधिक शेतकरी दर रोज 2 लाख 10 हजार लीटर दुध संकलीत करत आहेत. येणाऱ्या काळात 11 जिल्ह्यातील 79 गावांमध्ये विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प राबवून दररोज किमान 25 लाख लीटरपर्यत दूध संकलित करण्याचा मानस असल्याचे सांगितले. वाय. वाय. पाटील यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. संचालन शिल्पा बेहरे यांनी केले.एक दिवसीय कार्यक्रमात शेतकऱ्यांना दूधाळू जनावरांचे संगोपन याविषयी विविध तज्ज्ञानी मार्गदर्शन केले.