नागपूर : पाकिस्तान व अमेरिकेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून ब्रह्मोस एरोस्पेसच्या नागपूर यूनिटमधील निशांत अग्रवाल या अभियंत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विद्यमान जिल्हा न्यायाधीश क्रमांक.१ श्रीमती देशपांडे यांच्या कोर्टात हा खटला विशेष सरकारी वकील ज्योती वजानी यांनी चालवला. कलम तीन आणि पाच ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट नुसार आरोपी निशांत अग्रवाल याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
निशांत अग्रवाल या अभियंत्याला २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. सीनियर सिस्टिम इंजिनिअर असलेला निशांत हनी ट्रॅपमध्ये फसून हेरगिरी करत होता. उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली होती. त्याने सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेत्रणास्त्रांची संवेदनशील गोपनीय माहिती पाकची गुप्तहेर संस्था आयएसआय व अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेलाही पुरवल्याचा आरोप आहे.निशांतकडून जप्त लॅपटॉपमध्ये क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाशी निगडित माहिती व दस्तऐवज मिळाले होते. संयुक्त पथकांनी निशांतच्या रुडकी येथील घर, ब्रह्मोसचे नागपूर यूनिट आणि नागपुरातील घरी झडती घेतली होती.
यूपी एटीएसने काही महिन्यांपूर्वी आयएसआय एजंटाला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून निशांत अग्रवालचे नाव समोर आले. मिलिटरी इंटेलिजन्सला याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर यूपी एटीएस व मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकांनी त्याची माहिती जमवणे सुरू केले होते. निशांत हा फेसबुकवर पाकच्या महिला मित्रांसोबत डीआरडीओची माहिती शेअर करीत होता. ही माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला पोहोचवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.