नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहाच्या बेंचवर उडी मारली. तसेच गोंधळ घालण्याच्या प्रयत्न केला.
त्याबरोबरच त्यांनी सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. या प्रकरणामुळे सभागृहात एकाच खळबळ उडाली. लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
माहितीनुसार, संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाचं नाव सागर असल्याचे समोर आले आहे. तर संसदेबाहेर स्मोक कँडल पेटवणारा अमोल शिंदे हा तरुण महाराष्ट्रातील लातूर येथील असल्याचे समोर येत आहे.
तसेच त्याच्यासोबत असलेल्या महिलेचं नाव नीलम सिंह असल्याचे समोर येत आहे. या तरुणांना खासदारांनी पकडले आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले. संसदेच्या सुरक्षेमधील ही गंभीर चूक असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाण साधला आहे.
महत्त्वाचे म्हणजे आज १३ डिसेंबर रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याला २२ वर्षं पूर्ण झाली आहे. त्याच दिवशी लोकसभेत हा प्रकार घडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.