दहावीच्या मोफत ‘क्रॅश कोर्स’च्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना केले आवाहन
नागपूर : नागपूर महानगरपालिकेेेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता चांगली आहे, परंतु त्यांना चांगल्या शैक्षणिक वातावरणाची गरज आहे. यासाठी मनपा सतत प्रयत्नशील आहे. असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटसच्या माध्यमातून मनपाचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर बनू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून या संधीच सोन करावं, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. नागपूर महानगर पालिका आणि असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटस नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत ‘क्रॅश कोर्स’चे उद्घाटन शनिवारी (ता. 13) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी बोलत होते.
भिडे गर्ल्स हायस्कूल येथील स्व. राजाभाऊ चितळे सभागृहात पार पडलेल्या उद्घाटन समारंभात शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर, असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटसचे अध्यक्ष रजनीकांत बोंदरे, प्रकल्प समन्वयक जयंत गणवीर, सचिव पाणिनी तेलंग मंचावर उपस्थित होते.
महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, मनपाच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी मनपा आणि असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटस (ACI) च्या सहकार्याने मनपाच्या इयत्ता दहावीत शिकत असणाऱ्या १०० हुशार विद्यार्थ्यांना क्रॅश कोर्स सुरू करण्यात आले आहे. यासाठी मा. महापौरांनी ACI चे आभार मानले. पुढे म्हणाले, मनपाच्या शाळेत अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. प्रत्येक वर्षी ९० टक्के घेऊन पास होणारे अनेक विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना आणखी चांगले मार्गदर्शन मिळाले तर ते सुद्धा जेईई, नीट सारखी परीक्षा पास होऊ शकतात. मुलांनी आपली क्षमता ओळखून या संधीचा सोन करावं तसेच आपल्या मुलांसाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी ही एक चांगली संधी चालून आली आहे. मुलांना शिकवणी वर्गाला नियमित पाठवण्याचे आवाहन सुद्धा महापौर दयाशंकर तिवारी यांनी पालकांना केले.
महापौर दयाशंकर तिवारी पुढे म्हणाले, सुपर-३० च्या धर्तीवर नागपुरातून मनपाचे सुपर-७५ विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर किंवा एनडीएच्या सेवेत जावे अशी इच्छा मा. महापौरांनी पदग्रहणाच्या दिवशी व्यक्त केली होती. यासंबंधीचा प्रस्ताव असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटस समोर ठेवल्यानंतर लगेच त्यांनी होकार दिला आणि या प्रक्रियेला उत्साहाने सुरुवात झाली. यामध्ये मनपाच्या इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि एनडीएच्या परीक्षेसाठी दरवर्षी ७५ मुलांना तयार केले जाणार आहे. यातील २५ मुलं जेईई, आयआयटी, २५ मुलं मेडिकल आणि २५ मुलं एनडीए मध्ये जाऊन देशसेवा करतील आशा पद्धतीने यांना तयार करण्यात येईल. या ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी येत्या २८ फेब्रुवारीला ४५० विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिली.
क्रॅश कोर्स मध्ये मनपाच्या १०० विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. यामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षकांडून मार्गदर्शन केले जाणार आहे. कोणत्याही भाषेत शिकणारा विद्यार्थी मागे राहू नये यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद यांच्या शालेय जीवनातील एक प्रसंग सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून मा. महापौरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 पासून सीताबर्डी येथील जानकी टॉकीज जवळ स्नेहा सायन्स अकॅडमी, जानकी मार्केट दुसरा माळा येथे सुरू करण्यात आले आहे.
ACI नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी : रजनीकांत बोंदरे, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटस
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकाराने मनपाच्या शाळेतील हुशार विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी वर्ग संघटनेतर्फे मोफत कोचिंग क्लास सुरू करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयाचे मार्गदर्शन करण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यांच्या ज्ञानात वाढ होईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष रजनीकांत बोंदरे यांनी यावेळी केले. ACI नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास रजनीकांत बोंदरे यांनी दिला.
कार्यक्रमात सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, संयोजक प्रशांत टेम्भुरणे, समीर फाले, श्याम शेंदरे, गणित शिक्षक अब्दुल सर, हिंदी मध्यमच्या रिहाना मॅडम, उर्दू मध्यमचे आतिर सर, नाईल मॅडम, गणित, मराठी आणि हिंदी माध्यमचे रुईकर सर, मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या मेडपल्लीवर, राजेंद्र पुसेकर तसेच शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आरती क्षीरसागर यांनी तर आभार सचिव पाणिनी तेलंग यांनी मानले असून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.