सुनीता मौंदेकर यांनी दिले प्रशिक्षण : झोन सभापतींचा पुढाकार
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनमधील महिला कर्मचा-यांनी मंगळवारी (ता.१२) स्वसंरक्षणाचे धडे घेतले. ‘मिशन साहसी’च्या सुनीता मौंदेकर यांनी झोनमधील महिलांना संकटप्रसंगी स्वसंरक्षणाच्या विविध क्लृप्त्या सांगत त्यांना प्रशिक्षण दिले.
मनपाच्या राजे रघुजी भोसले नगर भवन येथे स्वयंसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपमहापौर मनीषा धावडे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका नेहा वाघमारे, नगरसेविका सरला नायक, प्रश्चिम नागपूरच्या बेटी बचाव बेटी पढाओ अभियान प्रमुख सुगीता दंडिगे उपस्थित होत्या. गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपमहापौर मनीषा धावडे म्हणाल्या, रोजच वर्तमानत्र, वृत्त वाहिन्यांवर महिला किंवा मुलींवरील अत्याचाराचे वृत्त असते. आज महिलांना शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह त्यांना स्वत:चे रक्षण करण्याइतपत सबळ बनविण्याची आवश्यकता आहे. समयसूचकतेने आपल्याकडे असलेल्या छोट्या वस्तू, साहित्य यांच्यामाध्यमातून सुद्धा महिला आपले संरक्षण करू शकतात. त्यांना प्रशिक्षण देउन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे कार्य ‘मिशन साहसी’च्या सुनीता मौंदेकर यांनी केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले.
प्रास्ताविकामध्ये गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विषद केली. कुटुंब, कार्यालय येथील कामाचा ताण यामुळे महिला स्वत:साठी वेळ देउ शकत नाही. अनाहुतपणे त्यांच्यावर काही प्रसंग ओढवल्यास त्याचा सक्षमपणे सामना करावा. त्यांनी दडपणात, भीतीमध्ये न जगता स्वच्छंदपणे जगावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पेन, ओळखपत्र हे सुद्धा मोठे शस्त्र
गांधीबाग झोनमधील महिला कर्मचा-यांना स्वसंरक्षणाचे धडे देताना सुनीता मौंदेकर यांनी अनेक ट्रिक्स सांगितल्या. कामाच्या ठिकाणाहून घरी परत जाताना, बाजारात भाजी घ्यायला जाताना, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना किंवा अनेक ठिकाणी महिलांना काही प्रसंगांचा सामना करावा लागतो. या प्रसंगांचा धैर्याने सामना करण्याचे त्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावरून न जाता वर्दळीच्या रस्त्याचा उपयोग करण्याचेही त्यांनी बजावले. आपल्यावर किंवा इतर मुली, महिलांवर अत्याचाराचा प्रसंग ओढवताना दिसल्यास त्वरीत त्यांच्या मदतीला जावे. हातात शस्त्र नसले तरी आपल्याकडील पेन, ओळखपत्र, हातातील कडे हे सुद्धा जीवघेणे शस्त्र ठरू शकतात याचे प्रात्याक्षिकही त्यांनी यावेळी महिलांना दिले. स्वत:सह घरातील मुली, महिला, मैत्रिणी यांनाही सुरक्षेच्या ट्रिक्स सांगण्याचे त्यांनी आवाहन केले.