केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या निर्देशान्वये १ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान भारतातील ७५ शहरांमध्ये पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता स्वनिधी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. देशातील ७५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील नाशिक, कल्याण-डोंबिवली, मुर्तीजापूर व नागपूर या चार शहरांचा समावेश आहे. त्याअंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे समाज विकास विभागाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनाच्या उद्देशाने शुक्रवारी २९ जुलै २०२२ रोजी सकाळी 10 वाजता पासून रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये स्वनिधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
२९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून आमदार सर्वश्री ना.गो. गाणार, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव श्री. मनु कुमार श्रीवास्तव, नगरविकास विभाग-२च्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी., नासुप्र चे सभापती श्री. मनोजकुमार सुर्यवंशी, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती असेल.
महोत्सवांतर्गत पथ विक्रेत्यांचे २९ स्टॉल, खाद्यपदार्थ विकणाऱ्या पथ विक्रेत्यांचे ३२ स्टॉल, स्वयंसहाय्यता बचत गटांचे ३७ स्टॉल तसेच विभागाचे ८ स्टॉल लावण्यात येणार आहे. शुक्रवारी २९ जुलै रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हे सर्व स्टॉल राहतील. सदर महोत्सवा अंतर्गत डिजिटल व्यवहार प्रशिक्षण, खाद्यपदार्थ विकणाऱ्या पथ विक्रेत्यांसाठी स्वच्छतेचे प्रशिक्षण, ई-कॉमर्स बाबतचे प्रशिक्षण, पीएमस्वनिधी योजने अंतर्गत क्यू आर कोड वितरण, पीएम स्वनिधी योजनेचे परिचय बोर्ड वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम, पीएमस्वनिधी योजने अंतर्गत उत्कृष्टरित्या लाभ घेतलेल्या पथ विक्रेत्यांचा सन्मान, पीएमस्वनिधी व दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजने बाबत उत्कृष्ट काम केलेल्या बँकांचा सन्मान, नुक्कड नाटक, आरोग्य शिबीर या व्यतिरिक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या पथ विक्रेत्यांचे विक्री स्टॉल, विविध दैनंदिन गरजेच्या वस्तू विक्री बाबतचे पथ विक्रेत्यांचे स्टॉल, स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी व विक्री स्टॉल इत्यादी कार्यक्रम महोत्सवाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
पथ विक्रेत्यांच्या कुटुंबाकरिता व स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांकरिता विविध ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे, आकर्षक बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहे. पीएम स्वनिधी व दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या लाभार्थ्यांसाठी कर्ज मेळावा आयोजित करण्यात आले आहे. सदर मेळाव्यचा लाभ जास्तीत जास्त पथ विक्रेत्यांनी व दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून, मेळाव्याचा लाभ घ्यावा, त्याचप्रमाणे स्वावलंबी पथ विक्रेत्यांकरिता ‘स्वनिधी महोत्सव’ नागपूर महानगरपालिके अंतर्गत पथ विक्रेते व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता आयोजित करण्यात येत आहे. करिता नागपूर शहरातील जास्तीत जास्त पथ विक्रेत्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे याबाबत अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना व श्री. राम जोशी यांनी आवाहन केले आहे.
स्वनिधी महोत्सवांतर्गत भजन, गायन, नृत्य, मिमिक्री, नाट्य, वादन, कुकिंग आदी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबियांसाठी करण्यात आले आहे. यासाठी मनपाद्वारे व्हिडिओ स्वरूपात सादरीकरण मागविण्यात आले आहे. यापैकी उत्कृष्ट गायन, नाट्य, वादन चे शुक्रवारी २९ जुलै रोजी सादरकरण केले जाणार आहे. तर नृत्य, गायन आणि कुकिंग स्पर्धेतील पहिल्या दोन विजेत्यांना प्रथम पुरस्कार ३००० रुपये आणि द्वितीय पुरस्कार २००० रुपये प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ९५ टक्क्यांच्या वर गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांनाही रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.