मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री पाडुरंग फुंडकर यांच निधन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. माझे जेष्ठ सहकारी पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाची बातमी माझ्यासाठी अतिशय वाईट आणि धक्कादायक होती. त्यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकाऱ्याला आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे. शेती आणि सहकारातील प्रश्नांची जाण असलेला नेता आपण गमावला आहे. विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळल्या आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्त-मित्रांच्या, कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भाऊसाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
तर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही पाडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आमचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने कृषिविषयक आणि सहकारक्षेत्रातील प्रश्नांची खरी जाण असणाऱ्या नेत्याला आपण मुकलो आहोत. आमचा प्रत्येक कार्यकर्ता आज दुःखात आहे. भाऊसाहेब यांना विनम्र श्रध्दांजली! असे तावडे म्हणाले आहे.