नागपूर: कोरोनाबाधितांची शुल्क वसुलीच्या नावावर लूट करणाऱ्या सेव्हन स्टार हॉस्पिटलला महापालिकेने नोटीस बजावून अनेक अनियमिततेबाबत २४ तासांत स्पष्टीकरण मागितले होते. परंतु कोव्हीड रुग्णांसाठी ८० टक्के बेडचे आरक्षण, रुग्णांकडून वसूल केलेले अतिरिक्त शुल्काबाबत स्पष्टीकरणात दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज आणखी एक नोटीस बजावून खासगी रुग्णालयाला दणका दिला आहे.
राज्य सरकारने खाजगी रुग्णालयांना कोव्हिडव रुग्णांसाठी आकारण्यात येणारे शुल्क ठरवून दिले आहे. परंतु राज्य सरकारच्या आदेशाला पायदळी तुडवित जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पीटलने रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याचे महापालिकेच्या तपासणीत उघडकीस आले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज राज्य सरकारने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त आकारलेले शुल्क रुग्णांना परत करा, असे आदेश ‘सेव्हन स्टार’ला दिले.
रुग्णांना पैसे परत देण्याचे निर्देश
दोन दिवसांत तपासणीदरम्यान आढळून आलेल्या अनियमिततेबाबत तसेच रुग्णांकडून वसूल करण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्काबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे शासनाच्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क वसूल केलेल्या रुग्णांना पैसे परत देण्याचे निर्देशही त्यांंनी दिले. दोन दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच आणीबाणी व्यवस्थापन, अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी ‘सेव्हन स्टार’ प्रशासनाला दिला.
६८७ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती दडवली
सेव्हन स्टार रुग्णालयात तपासणी केल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे जप्त केली होती. यात विविध आजारावरील उपचारासाठी दाखल झालेल्या ९९१ रुग्णांची कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. या ९९१ रुग्णांपैकी केवळ ३०४ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती सेव्हन स्टारने महापालिकेला दिली. परंतु ६८७ रुग्णांकडून वसूल केलेल्या शुल्काची माहिती दडविल्याचेही पुढे आले.
महापालिकेसोबत सेव्हन स्टारची मुजोरी
रुग्णांकडून खाजगी रुग्णालयांनी घ्यावयाच्या शुल्काबाबत राज्य सरकारने २१ मे २०२० ला मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. परंतु या मार्गदर्शक तत्वांबाबत माहिती नसल्याचे सेव्हन स्टारने महापालिकेला कळविले होते. यावर आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत मार्गदर्शक तत्तवाबाबत महापालिकेनेही जनजागृती केली होती असे आज दिलेल्या नोटीसमध्ये नमुद केले.