नागपूर : शहरातील बेलतरोडी आणि हुडकेश्वरमध्ये एका सदनिकेत गुन्हे शाखेने ‘सेक्स रॅकेट’चा भांडाफोड केला आहे. यादरम्यान दोन तरुणीची सुटका करण्यात आली.
या तरुणींना जबदस्तीने देहव्यापाराच्या दलदलीत ढकलणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेने अटक केली. अंजली ऊर्फ नूतन काळसर्पे (३०, रा. तिरुपती टॉवर्स, बेसा पॉवर हाऊसजवळ) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
शहरात सेक्स रॅकेट सुरु असल्याची गुप्त माहिती पोलीस विभागला मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी याची गंभीर दखल घेत तडकाफडकी पाऊले उचलली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी पथकासह हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी पुलाजवळून बेसा पॉवर हाऊसकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या तिरुपती टॉवर्समधील तिसऱ्या माळ्यावरील एका सदनिकेत धाड टाकली. यात २२ आणि २४ वर्षीय दोन तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. दोन्ही तरुणी नागपुरातील असून अविवाहित आहेत.
आरोपी महिला अंजली काळसर्पे हिने दोन्ही तरुणींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारात ओढले होते. अंजली ही गेल्या अनेक दिवसांपासून देहव्यापारात सक्रिय होती. तिच्या प्रियकरासह मिळून ती सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सापळा रचून दोन बनावट ग्राहकांना अंजलीच्या सदनिकेत पाठवले .यात तिच्यासोबत ५ हजारच सौदा करण्यात आला.