नागपूर : शहरातील सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ओयो हॉटेल हॅपी स्प्रिंगमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ३.२० ते रात्री ११.४० दरम्यान केलेल्या कारवाईत करण्यात आली. हे हॉटेल अचरज टॉवर, काटोल रोड, छावणी येथे असून याठिकाणाहून पोलिसांनी चार पीडित मुलींची सुटका केली.
तसेच पोलिसांनी हॉटेलच्या रूम नं. २०२ मध्ये आरोपी चेतन विजय चकोले (२४, रा. गंगाबाग, नागपूर), युगांत दिनेश दुर्गे (१९, रा. विसापूर, जि. चंद्रपूर) यांना अटक केली असून, राहुल उर्फ अंकुश दिलीप घाटोळे आणि दीपक नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त केले होते. तसेच हॉटेलमध्ये ग्राहकांना हुक्काही पुरविला जात असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी आरोपींविरोधात कलम १४३(३), अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत कलम ४, ५, ७, तसेच तंबाखू उत्पादने (विज्ञापन प्रतिबंध व व्यापार नियमन) अधिनियम २००३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) राहुल माकणीकर, आणि सहायक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कविता इसारकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या केली..