नागपूर : बालाजीनगर-बंशीनगर मेट्रो स्टेशनजवळ हिंगणा मार्गावर ओयो होटल यश-२४ हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.या कारवाईदरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आहे तर आंतरराज्यातील पाच तरुणींची सुटका करण्यात आली. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, कोलकाताहून या मुलींना बोलविण्यात आले होते.
माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून तेथे दिल्ली, मुंबई, काश्मीरसह अन्य राज्यातील तरुणींना देहव्यापार करण्यासाठी बोलावण्यात येत होते. गुन्हे शाखेच्या कविता इसारकर यांना यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
याप्रकरणी पोलिसांनी यश दिपकराव बलोदे (२०, भट्टीपुरा, चांदुरबाजार, अमरावती), शुभम बलवंत मालखेडे (२२, भट्टीपुरा, चांदुरबाजार, अमरावती), संकेत विष्णू तितरमारे (२५, हिंगणा रोड), मनोज अरूण खंडारे (३६, इंदिरा माता नगर) व सागर मधुकर बिजवे (३१, अचलपूर, अमरावती) यांना अटक केली. तर त्यांचे साथीदार मनोज अग्रवाल व राहुल यांचा शोध सुरू आहे. आरोपी ग्राहकांकडुन पैसे घेऊन तरुणींकडून देहव्यापार करवून घेत होते. आरोपींच्या ताब्यातुन सहा मोबाईलसह १ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.